महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मे ।। देशात पुढील २ दिवस तरी उष्ण वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट (Heatwave ) देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामान विभागाने आज (दि.२८) दिलेल्या बुलेटीननुसार, विदर्भातील अकोला, चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना २८ मे रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर २८,२९ आणि ३० मे रोजी अकोलासह चंद्रपूर, नागपूर, वर्धा या ठिकाणी ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील विदर्भातील या जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
28 May, #Heatwave alerts in #Maharashtra #Vidarbha for the next 24 hrs.
Pl take care, there are Orange???? alerts too. pic.twitter.com/z6PPFeitig— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 28, 2024
मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल
वायव्य आणि मध्य भारतातील प्रचलित उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेची लाट 30 मे 2024 पासून हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. पुढे केरळमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस सुरू होण्यासाठी आणि पुढील 3-4 दिवसांत ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांत पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमान घटणार; डॉ. नरेश कुमार
उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेबाबत, वरिष्ठ IMD शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार म्हणतात, “राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट राहील. त्यानंतर, उष्णतेची लाट थोडी कमी होईल. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट होणार आहे आणि येत्या 3-4 दिवसांत केरळमध्ये उष्णतेची लाट कमी होण्याची शक्यता आहे.