पुणे आंदोलनप्रकरणी अंधारे-धंगेकरांच्या अडचणी वाढणार ? मंत्री शंभुराज देसाईं ॲक्शन मोडवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे ।। शहरातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघातप्रकरणात (Accident) एकीकडे कारवाईचा बडगा उगारला जात आहे. याप्रकरणी, नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉ. अजय तावरे आणि शिपायाचे निलंबन केलं आहे. तर, डॉ. हरनोळवरही कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे अग्रवाल बाप-लेक आणि आजोबा तुरुंगात आहेत. मात्र, याप्रकरणावरुन पुण्यातील पब संस्कृतीचा पर्दाफाश करणाऱ्या व सरकारला धारेवर धरणाऱ्या आंदोलक आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) व शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, अंधारे व धंगेकर यांनी पुण्यातील एक्साईज कार्यालयात जाऊन पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यावेळी, मंत्री शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांचेही नाव घेतल्याने आता मंत्री महोदयांनी इशारा दिला आहे. माझ्याकडे नोटीस तयार आहे, पुढील 72 तासांत मी संबंधितांना नोटीस बजावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.

आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी उत्पादक शुल्क कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चक्क भ्रष्टाचारी हफ्त्याचे रेटकार्डच वाचून दाखवलं होतं. तसेच, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही केली होती. त्यावर, आता उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई आक्रमक झाले आहेत. याबाबत मंत्री देसाई म्हणाले की, विधानसभा सदस्य पुणे रविंद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे येथे शासकिय कार्यालयात जाऊन जाब विचारला. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर पोलिस उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. मात्र, आंदोलन करताना खोक्यावर व हातात पैसे घेऊन आंदोलन केले. माझा फोटो त्यावर होता, मला ते व्हिडिओ आले मी प्रवासात पाहिलं. त्यामुळे, मी त्यांना नोटीस बजावणार आहे. रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते. यापूर्वी ललित पाटील प्रकरणात माझं नाव सुषमा अंधारे यांनी घेतलं होतं. त्याचवेळी मी स्पष्ट केलं होतं की अंधारे यांनी वक्तव्य मागे घ्यावे. त्यांनी ते मागे घेतलं नाही. सध्या पाटण कोर्टात याप्रकरणी तारीख पडत आहे. न्यायालयाची सुट्टी संपली की मी कोर्टाला विनंती करणार आहे की, लवकरच ललित पाटील प्रकरणी तारीख द्यावी आणि माझी बाजू ऐकून घ्यावी.

3 दिवसांचा अवधी
निवडणुका असल्याने मी गेलो नव्हतो जबाब नोंदवायला. मात्र, आता जाईन. आधीच कोर्टात केस असताना पुन्हा पुन्हा माझावर आरोप करत आहेत. मी आज धंगेकर आणि अंधारे यांना पुन्हा नोटीस बजावत आहे. तीन दिवसात त्यांनी त्यांची विधानं मागे घ्यावीत. जर, त्यांनी विधानं मागे घेतली नाहीत, तर मी पुढे कायदेशीर कारवाईसाठी हालचाल करीन, अशा शब्दात मंत्री शंभूराजे देसाई यांनी पुणे प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांना थेट इशाराच दिला आहे.

49 बारवर निलंबनाची कारवाई
पब, रूप टॉप किंवा रेस्टॉरंट असतील त्यांना, परवानगी स्थानिक पातळीवर दिली जाते. मात्र अंमली पदार्थाचे सेवन, अवैध दारू विक्री याच्यावर आम्ही कारवाई करतो. आमच्या कारवाई होत असतात, पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये 49 बारवर आम्ही निलंबनाची कारवाई केली आहे, अशी माहितीही मंत्री देसाई यांनी दिली.

शंभुराजेंच्या इशाऱ्यावर धंगेकरांचा पलटवार
अजून मला नोटीस प्राप्त झाली नाही, पण नोटीस पाठवल्यानंतर मी त्याला उत्तर देईन. जर माझ्यावर हक्कभंग करायला गेले तर मी त्यांचा भंग करेन, असे प्रत्त्युत्तर आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिलं. पुणे शहरात पबसंस्कृती वाढली आहे, त्या खात्याचे मंत्री शंभूराजे देसाई आहेत. पण, एखादा माणूस समाजासाठी लढतोय, बोलतोय त्यालाचा दाबायचा प्रयत्न केला जातोय आणि भ्रष्टाचारी सिस्टीमच्या पाठिशी उभे राहण्याचा प्रयत्न मंत्री करत असतील तर त्यांनी हक्कभंग केल्यास, मी भंग करतो, असा इशाराही धंगेकर यांनी दिली. तसेच, माझ्याकडे दुसरी यादीही आहे, मी जे पहिले रेटकार्ड दिले ते खरं होतं. अगदी मंत्र्यांपर्यंत हे सगळं जातं, असेही धंगेकर यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *