Pandharpur News : तब्बल अडीज महिन्यानंतर पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ जुन ।। पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आजपासून पुन्हा सुरू झाले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थिती रविवारी पहाटे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नित्य पूजा संपन्न झाली. त्यानंतर भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संवर्धन आणि सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आलं होतं. त्यामुळे १५ मार्चपासून भाविकांना पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आलं. आता आषाढी वारीच्या एक महिनाआधी मंदिरातील पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.

पंढरपूरच्या मंदिराला सातशे वर्षाचे मूळ रूप देण्यात आले आहे. आज पहिल्यांदाच मंदिराचे नवे रुप समोर आले आहे. मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. विठुरायाचे सावळे रूप पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.

चंद्रकांत पाटलांनी घातलं विठुरायाला साकडं
राज्यात चांगला पाऊस होऊ दे, शेतकरी समाधानी होऊ दे, असं साकड पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठुरायाला घातलं. माध्यमांसोबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. तर काही भागात दुष्काळ देखील पडला आहे. त्यामुळे यंदा पाऊस होऊन शेतकरी सुखी व्हावा, अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी केली आहे”.

“राज्य सरकारने विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धन कामासाठी ७५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामधून हे सुंदर काम झालेले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. गेल्यावेळी राज्यात विरोधकांना ७ जागा मिळाल्या होत्या. त्या आता वाढून ८ इतक्या होतील. तर महायुतीला ३८ ते ४१ जागा मिळतील”, असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *