महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ जुन ।। माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासमोर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचं आव्हान आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून झालेल्या पराभवानंतर पंकजांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे खासदारकीचं स्वप्न पाहत त्या कुटुंबाच्या पारंपरिक मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरल्या. दोन वेळा खासदार राहिलेल्या बहीण प्रीतम मुंडे यांचा पत्ता पक्षाने कट करुन पंकजांना तिकीट दिले होते. मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये पंकजा मुंडेंना पिछाडी मिळाली आहे.
निवडणूक कुठलीही असो त्यात संघर्ष, स्पर्धा, अटीतटीची लढत नाही, असे बीडमध्ये कधी होत नाही. त्याला यंदाची लोकसभा निवडणूकही अपवाद ठरलेली नाही. महायुतीच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत या वेळी पाहावयास मिळाली. विकासाच्या आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणुकीत चर्चा होतानाच अखेरच्या टप्प्यात निवडणूक वेगळ्याच वळणावर जात असल्याचे चित्र दिसले.
