महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुन ।। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात रुजवण्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोन नेत्यांचा मोठा वाटा आहे. कोणे एके काळी शून्यात असलेल्या पक्षाचा विस्तार करण्यात मुंडे-महाजन जोडगोळीने मोठा हातभार लावला आहे. महाजन आणि मुंडे या दोन्ही बड्या नेत्यांना अकाली मृत्यूने गाठलं. त्यानंतर दोघांचाही राजकीय वारसा त्यांच्या कन्या चालवत होत्या. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंडे-महाजन या दोघांच्याही तीन कन्या संसदेपासून लांब राहिल्या आहेत.
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे एकमेकांचे मित्रही आणि नातेवाईकही. प्रमोद महाजनांची भगिनी प्रज्ञा ही गोपीनाथ मुंडे यांची पत्नी. एका अर्थाने तिघी सख्ख्या आत्ते-मामे बहिणीच एकाच वेळी संसदीय राजकारणातून दूर झाल्या आहेत.
प्रमोद महाजन यांची २००६ मध्ये हत्या झाली. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कन्या पूनम महाजन मैदानात उतरल्या आणि सलग दोन वेळा मोदी लाटेत निवडूनही आल्या. मात्र उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात त्यांच्याविषयी रोष असल्याच्या कारणावरुन त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे पूनम महाजन आता संसदीय राजकारणापासून दूर राहिल्या आहेत.
