Lok Sabha Election 2024 Result: पवारांच्या जबरदस्त यशाला एका कारणानं गालबोट; जिव्हारी लागणारा पराभव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जुन ।। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी जबरदस्त कामगिरी केली. पुतण्यानं सोडलेली साथ, हातातून गेलेला पक्ष, लेकीची जागा टिकवण्याचं आव्हान अशा प्रतिकूल परिस्थितीत शरद पवार लढले आणि जिंकले. १० जागा लढवत त्यांनी ८ जागांवर बाजी मारली. शरद पवारांची तुतारी महाराष्ट्रात वाजली. त्यामुळे महायुतीची गाडी १७ जागांवर अडली. महाविकास आघाडीनं ३० जागा निवडून आणल्या.

शरद पवारांचा लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट ८० टक्के राहिला. त्यांच्या पक्षानं नव्या चिन्हासह १० जागा लढवल्या. त्यापैकी ८ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले. अजित पवारांशी सामना झालेल्या दोन्ही जागा पवारांनी जिंकल्या. बारामतीत पुतण्याला पाणी पाजत पवारांनी लेकीला निवडून आणलं. पवारांच्या स्ट्राईक रेट राज्यात अन्य कोणत्याच पक्षाचा नाही. पण या विजयाला एका जागेमुळे गालबोट लागलं.

शरद पवारांच्या पक्षानं रावेर आणि साताऱ्याची जागा गमावली. रावेरची जागा शरद पवारांनी एकनाथ खडसेंसाठी घेतली होती. पण खडसेंनी भाजपकडे परतण्याची तयारी केली. त्यामुळे रावेरमध्ये पवारांना श्रीराम पवारांना उमेदवारी द्यावी लागली. राजकारणात नवखे असलेले पवार पराभूत होणार याची कल्पना पवारांना होती.

साताऱ्यातील पराभव शरद पवारांच्या जिव्हारी लागणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून साताऱ्यानं पवारांना कायम साथ दिली. मोदी लाटेतही पवारांचा बालेकिल्ला त्यांच्याशी खंबीरपणे उभा राहिला. २०१४ आणि २०१९ मध्ये इथून उदयनराजे भोसले निवडून आले. पण २०१९ मध्ये विजयी झाल्यानंतर भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे साताऱ्यात पोटनिवडणूक लागली.

शरद पवारांनी भरपावसात सभा गाजवली. उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडून आले. साताऱ्याचा बालेकिल्ला पवारांनी राखला. पण त्यावेळी कोरेगाव विधानसभेत शरद पवारांचे विश्वासू शिलेदार शशिकांत शिंदे पराभूत झाले. गड आला, पण सिंह गेला अशी स्थिती झाल्यानं पवारांनी सेलिब्रेशन टाळलं.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत श्रीनिवास पाटलांनी वाढत्या वयाच्या कारणामुळे लढण्यास असमर्थतता दर्शवली. त्यामुळे पवारांनी शशिकांत शिंदेंना तिकीट दिलं. खंद्या समर्थकासाठी पवारांनी प्रचार केला. शिंदेंनी राजेंना टफ फाईट दिली. पण त्यांचा पराभव झाला. राजे ३२ हजार ७७१ मतांनी निवडून आले. त्यामुळे गड गेला आणि सिंहही गेला अशी परिस्थिती निर्माण झाली. विशेष म्हणजे भाजपनं पहिल्यांदाच साताऱ्यात लोकसभा निवडणूक जिंकली. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला गमावण्याची वेळ पवारांवर आली. त्यामुळे हा पराभव जिव्हारी लागणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *