महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुन ।। Konkan Political: पूर्वी मुंबईप्रमाणेच कोकण देखील शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जायचा, मात्र कोकण आणि शिवसेनेची ही घट्ट वीण या लोकसभा निवडणुकीत मात्र उसवल्याचे समोर आले.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मतदारांनी कोकणातून ठाकरे सेनेला हद्दपार केल्याचे निदर्शनास येते आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत, महायुतीचे उमेदवार अनंत गीते, रायगडचा काही भाग असणारा मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना घरचा रस्ता धरावा लागला. या निवडणुकीत विशेषत: कोकणात ठाकरे गटाचे पानिपत झाले. त्यातच ठाकरेंचे कट्टर विरोधक असलेल्या राणेंनी लोकसभा जिंकल्याने कोकणावरील ठाकरेंची पकड आता चांगलीच सैल झाल्याचे दिसून येते.
कोकणी माणूस मुंबईतला असो अथवा कोकणातील, त्याने ठाकरे कुटुंबावर भरभरून प्रेम केले. कोकणातून लाखोंच्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून गेले आहेत, परंतु पक्ष फुटीनंतर कोकणी माणसाने ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवल्याचे या लोकसभा निवडणुकीच्या निकालात जाणवते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून परिचित आहे.
या मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत हे गेल्या निवडणुकीत भरघोस मताधिक्याने निवडून आले होते, परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात फिरवलेली पाठ आणि राज्य सरकारच्या प्रकल्पांना केलेला विरोध कोकणी माणसाला रुचलेला दिसत नाही. त्यामुळे विनायक राऊत यांना कोकणी माणसाने नाकारले आणि नारायण राणेंच्या बाजूने कौल दिला. राणेंनी ४ लाख ४८ हजार ५१४ मते पटकावत आपला विजय नोंदवला.
राऊत यांना ४७ हजार ८५८ मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले. रत्नागिरी लोकसभेतील प्रत्येक बूथ निहाय आणि विधानसभा मतदारसंघनिहाय ठाकरे सेना मागे पडल्याचे चित्र दिसते आहे. या मतदारसंघात भाजपच्या राणेंसोबत एकनाथ शिंदे यांची सेना ताकदीने उतरल्यामुळे राणेंचा विजय सोपा झाला. रायगडमध्येही शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दणक्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांना जोरदार फटका बसला. रायगडमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार या महाविकास आघाडीच्या दोन्ही बड्या नेत्यांनी सभा घेतल्या.
तरीसुद्धा अनंत गीतेंना विजय मिळवता आला नाही. सुनील तटकरे यांच्यावर मुस्लिम, आगरी-कोळी, मराठा आणि इतर बहुजन वर्गातील मतदारांनी ठेवलेल्या विश्वासामुळे तटकरे यांचा ८२ हजार ७८४ मतांनी विजय झाला. तटकरे यांना पाच लाख ८ हजार ३५२ मते मिळाली, तर गीतेंना ४ लाख २५ हजार ५६८ मते मिळाली.
रत्नागिरी आणि रायगडमध्ये फटका बसल्यानंतरही ठाणे मतदारसंघात शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार राजन विचारे यांचा सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला. हा मतदारसंघ आनंद दिघेंकरिता खेचून आणून बालेकिला शाबूत ठेवून करून दाखवले. हाच ट्रेंड आता विधानसभेतही कायम राहिल्यास ठाकरे सेनेची कोकणावर असलेली पकड कायमची सैल होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करताना दिसतात.