Matheran Mini Train : नेरळ-माथेरान मिनीट्रेन सेवा आजपासून राहणार बंद; पर्यटकांसाठी प्रवासाचे पर्याय कोणते?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुन ।। नेरळ-माथेरान प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन आज शनिवारपासून ४ महिन्यांच्या पावसाळी सुटीवर जाणार आहे. पावसाळ्यात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. नेरळ ते माथेरान हा मिनीट्रेन मार्ग डोंगरातून जातो.

मुसळधार पावसामुळे काही भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने हा मार्ग धोकादायक ठरतो. त्यामुळे प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून हा रेल्वेमार्ग दरवर्षी बंद करण्यात येतो. दरवर्षी १५ जूनपासून पावसाळी कालावधीसाठी माथेरानची मिनीट्रेन सेवा बंद होते.

मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. त्यामुळे परिसरात सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे. परिणामी एका आठवड्याआधीच मिनीट्रेन सेवा बंद करण्यात आल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले. १५ ऑक्टोबर नंतर माथेरानची राणी पुन्हा पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार आहे.

दरम्यान, पावसाळ्यात माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठी असल्याने पर्यटकांच्या सुविधेसाठी अमन लॉज ते माथेरानदरम्यान मिनीट्रेनच्या शटल फेऱ्या चालवण्यात येतात. या सेवा सुरूच राहणार असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. त्यानुसार, अमन लॉज ते माथेरानदरम्यान सोमवार ते शुक्रवारदरम्यान रोज ६ शटल फेऱ्या धावतील.

शनिवारी-रविवारी प्रवाशांच्या संख्या अधिक असल्याने २ वाढीव फेऱ्यांसह एकूण ८ फेऱ्या चालवण्यात येतील. सहा डब्यांची मिनी ट्रेन पावसाळ्यात सुरू राहील, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर ८ जून ते १५ ऑक्टोबरदरम्यान नेरळ ते अमन लॉजदरम्यान मिनीट्रेन फेऱ्या बंद राहणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *