महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुन ।। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदाचा राजीनामा देण्यावर ठाम असून, त्यांनी शुक्रवारीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. शहा यांनी फडणवीस यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले, तरी फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी उशिरा चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते.
‘एनडीए’च्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही शुक्रवारी दिल्लीत होते. राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि केंद्रीय मंत्रिपदावर चर्चा करण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी तिन्ही नेत्यांची बैठक झाली. बैठकीनंतर फडणवीस यांनी शहा यांचीही भेट घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनेवरून महाराष्ट्रातील भाजपचे सर्व आमदार आणि विधान परिषद सदस्यांची एक महत्त्वाची तातडीची बैठक उद्या, शनिवारी (८ जून) बोलावण्यात आली आहे. मात्र, फडणवीस यांनी आपला निर्णय बदलला नाही, तर एखाद्या नेत्याची लॉटरी लागू शकते, अशी दिल्लीत चर्चा आहे.