महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुन ।। लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून एनडी’ला बहुमत मिळाले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. रविवारी ९ जून रोजी शपथविधा सोहळा होणार आहे.या सोहळ्यासाठी ७ शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यासह शेजारील आणि सात हिंद महासागर क्षेत्रातील देशांचे नेते ९ जून रोजी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एका निवेदनात ही माहिती दिली आहे. “मोदींच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी या नेत्यांची भेट भारताने “नेबरहुड फर्स्ट” धोरणाचा भाग म्हणून हाती घेतली आहे, असंही निवेदनात म्हटले आहे.
शेख हसीना आणि मुइज्जू यांच्या व्यतिरिक्त, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. निवेदनात म्हटले आहे की, शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याव्यतिरिक्त हे नेते रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीलाही उपस्थित राहणार आहेत.
या निमंत्रितांच्या यादीत मुइझू यांचा समावेश केला आहे. गेल्या वर्षी निवडून आल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले आहेत. मालदीवला चीनच्या जवळ आणण्यासाठी मुइझूने अनेक पावले उचलली आहेत. भारताला ८५ हून अधिक लष्करी जवानांना माघार घ्यावी लागली. खाद्यपदार्थ आणि संरक्षण उपकरणांच्या पुरवठ्यासाठी त्यांनी तुर्की आणि चीनसोबत करारही केले आहेत. त्यांनी भारतावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत भेटीवर आलेल्या या नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी स्वतंत्र द्विपक्षीय बैठक घेणार की नाही हे सध्या स्पष्ट झालेले नाही. बांगलादेशचे पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्रपती शनिवारी नवी दिल्लीत पोहोचणार आहेत. इतर सर्व नेते रविवारीच येतील. नेपाळचे पंतप्रधान शपथविधी सोहळ्याच्या सुमारे चार तास आधी नवी दिल्लीत पोहोचतील. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.