कोरोना नियंत्रणासाठी पोलिसांनी दिलेल्या योगदानाचा ना. अशोकराव चव्हाण यांनी केला गौरव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड – कोणत्याही गावाची चांगली प्रतिमा ही त्या गावातील सामाजिक सौहार्दावर, धार्मिक एकोप्यावर, एकात्मतेवर अवलंबून असते. या एकोप्याला, एकात्मतेला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बांधव आहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. समाजाची सुरक्षितता घेत असतांना राज्यातील 37 पोलिस जवानांना आजवर कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. पोलिसांना कुटुंबांची अधिक काळजी घेता यावी व कुटुंबासमवेत राहता यावे यादृष्टिने सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. अर्धापूर येथे उभारले जाणारे हे पोलिस स्टेशन आणि येथील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल हा याच प्रयत्नांचा भाग असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. अर्धापूर येथील पोलिस स्टेशन इमारतीचे व पोलिस निवासी संकुलाचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, अर्धापूर नगरपालिकेच्या अध्यक्षा सुमेरा बेगम शेख लायक, उपनगराध्यक्षा डॉ. पल्लवी लंगडे व मान्यवर उपस्थित होते.

*अर्धापूर शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेला *5 कोटीचे विशेष अनुदान*
अर्धापूर शहरातून नागपूर-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 गेला असल्याने या महामार्गासाठी अर्धापूर शहरातील व ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या जमिनी यासाठी उपयोगात आल्या. सदर महामार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्याने यात ज्यांच्या जमिनी गेल्या त्या बाधितांना राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार मोबदला मिळावा यासाठी येथील जनतेची अनेक दिवसांपासून मागणी होती. या न्याय मागणीचा विचार करुन आता राष्ट्रीय महामार्गाच्या नियमाप्रमाणे सुयोग्य मोबदला बाधितांना दिला जाणार असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. याचबरोबर अर्धापूर शहरातील रस्ते विकास व इतर अत्यावश्यक कामांसाठी नगरविकास विभागाकडून 5 कोटी रुपयांचे विशेष अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. या अनुदानातून शहराच्या विकासाचा मार्ग आता अधिक प्रशस्त होईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाबाबत जनतेनेही अधिक सुरक्षितता बाळगून शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अर्धापूर येथील पोलिस स्टेशनची इमारत अत्यंत जुनी झाल्याने त्याठिकाणी नवीन इमारत बांधणे आवश्यक होते. पोलिस यंत्रणेच्या प्रशासकीय सुविधेसाठी या इमारतीची अत्यावश्यकता होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या या नवीन बांधकामात पोलिस ठाण्याची इमारत, निवास संकुलाचा समावेश आहे. या संकुलात इमारत प्रकार दोनचे 40, प्रकार तीनचे 6 आणि प्रकार चारचे एक असे एकुण 47 निवासस्थाने आहेत. या निवासी संकुलासाठी 11 कोटी 93 लाख 96 हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता आहे. तर पोलिस स्टेशनच्या इमारतीसाठी 3 कोटी 40 लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता आहेअसे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *