Weather Update : पुढचे काही तास महत्त्वाचे ! पुण्या मुंबईसह ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जुन ।। राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतही मध्यरात्रीपर्यंत पावसाच्या जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या ३-४ तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार अशा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

राज्यामध्ये मान्सूनचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर पुणे शहराजवळच्या घाटमाथ्यावर सोमवारी (ता. १०) मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान खात्याने रविवारी दिला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर सोमवारी मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट,’ तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने वर्तविला आहे.

मराठवाडा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती तयार झाली आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र सक्रिय आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. उर्वरित राज्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे. दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावत आहे.

शेतकऱ्यांना दिलासा! मुसळधार पावसामुळे उजनी धरणात वाढले दीड टीएमसी पाणी; ६३०० क्युसेक विसर्गाने येत आहे धरणात पाणी
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी कोकणातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जिल्ह्यात मुसळधार, तर कोकणासह पुणे व सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा आहे. तर, उर्वरित राज्यात वादळी वारे, विजांसह पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

दिवसभर विश्रांती; सायंकाळी हजेरी
पुण्याला शनिवारी मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. मात्र, सायंकाळी साडेआठनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. आद्रतेचे प्रमाणही वाढलेले होते. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी होऊन २९.२ अंश सेल्सिअस नोंदला. पुण्यात १ ते ९ जून या दरम्यान पुण्यात २०९.२ मिलिमीटर पाऊस पडला. या दरम्यान, पुण्यात ४९.७ मिलिमीटर पाऊस पडतो. या सरासरीच्या तुलनेत १५९.५ मिलिमीटर जास्त पावसाची नोंद झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *