Layoff : आर्थिक मंदीचा दणका! ‘या’ कंपनीकडून ३५०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जुन ।। देशभरात वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसत आहे. मात्र या महागाईचा मार सर्वसामान्य नागरिकांशिवाय इतर मोठ्या कंपन्यांनाही बसला आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे जगभरातील कंपन्यांनी संकटाची चाहूल लागताच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातच कॉर्पोरेट (Corporate) व आयटी (IT) क्षेत्रासह आता आणखी एका नावाजलेल्या कंपनीला आर्थिक मंदीचा दणका बसला आहे. त्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच ‘या’ मोठ्या कंपनीने देखील ३००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

‘या’ कंपनीला बसला आर्थिक दणका
वन९७ कम्युनिकेशन्स अर्थात ‘पेटीएम’चे (Paytm) स्वामित्व हक्क असणाऱ्या कंपनीकडून ३५०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याची माहिती मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी हा मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. त्यासोबत या कंपनीने, काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची आउटप्लेसमेंट अर्थात दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठीचा शोध घेण्यासंदर्भात काळजी घेत असल्याचा दावाही केला आहे.

दरम्यान, कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी नोकरी मिळवून देण्याच्या हेतूने सध्या कंपनीच्या HR विभागाकडून जवळपास ३० हून अधिक संस्थांशी संपर्क साधला जात आहे. त्यामुळे येत्या काळात नोकरी गमावलेल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या संस्थांमध्ये नोकरीवर रुजू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची बोनसची रक्कम आणि तत्सम देय रक्कम बाकी आहे, अशा कर्मचाऱ्यांना पूर्ण परतावा देण्यावर आपला भर असल्याचे पेटीएमकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पेटीएमने स्पष्ट केले कारण
जानेवारी ते मार्च २०२४ या महिन्यांमध्ये पेटीएममधील कर्मचाऱ्यांची संख्या ३५०० ने कमी होऊन आता ३६,५२१ वर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) पेटीएम पेमेंट्स, बँकिंग सेवांवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ही कर्मचारी कपात करण्यात आल्याचे म्हटले आहे. १५ मार्चपासूनच आरबीआयने कोणत्याही ग्राहक, वॉलेट, फास्टॅग मध्ये जमा रकमेचा स्वीकार करण्यावर बंदी आणली होती. त्यामुळे पेटीएमचे नुकसान चौथ्या तिमाहीत वाढून ५५० कोटींवर आले होते. येत्या काळात या अडचणी कमी होणार नसल्याचे चित्र दिसल्यामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *