महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आजही राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छ. संभाजीनगर आणि जालना वगळता आज संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता हळुहळु संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली असल्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील २४ तासांतही राज्यात पावसाची बॅटिंग सुरू राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.
कोणत्या भागात पावसाची शक्यता?
अमरावती, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, आणि अकोला जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दुसरीकडे नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव परभणी जिल्ह्यांत देखील विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव व लातूर जिल्ह्यांत येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तवली आहे. १२ जूनला नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. १३ जूनला लातूर व धाराशिव जिल्ह्यांत वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.