AUS vs NAM : कांगारूंचा दबदबा कायम ; झाम्पाचा ‘चौकार’ ; सुपर ८ मध्ये स्थान निश्चित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जुन ।। नवख्या नामिबियाच्या संघाला स्वस्तात गुंडाळून ऑस्ट्रेलियाने आपला दबदबा कायम ठेवला. नामिबिया आणि ऑस्ट्रेलिया हे संघ ब गटात असून, कांगारूंच्या संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आज नामिबियाला कमी धावसंख्येवर सर्वबाद करून त्यांनी तिसऱ्या विजयाकडे कूच केल्याचे दिसते. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने नामिबियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. विश्वचषकातील २४ वा सामना अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना नामिबियाचा संघ अवघ्या ७२ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पाने बळींचा चौकार लगावून चमकदार कामगिरी केली.

नामिबियाकडून कर्णधार गेरहार्ड इरास्मस (३६) वगळता एकाही फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर नामिबियाचा संघ १७ षटकांत ७२ धावांवर सर्वबाद झाला. फिरकीपटू ॲडम झाम्पाने कमाल करताना चार बळी घेऊन नामिबियाच्या फलंदाजीची कंबर मोडली. त्याच्याशिवाय जोश हेझलवुड (२), मार्कस स्टॉयनिस (२) आणि पॅट कमिन्स आणि नाथन एलिस यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

दरम्यान, नामिबियाविरूद्धचा सामना जिंकून सुपर ८ मध्ये स्थान निश्चित करण्याची सुवर्णसंधी ऑस्ट्रेलियाकडे आहे. असे झाल्यास सुपर ८ मध्ये स्थान मिळवणारा ऑस्ट्रेलिया दुसरा संघ ठरेल. या आधी दक्षिण आफ्रिकेने सुपर ८ चे तिकीट मिळवले आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ –
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, नाथन एलिस, ॲडम झाम्पा, जोश हेझलवुड.

नामिबियाचा संघ –
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), निकोलास डेव्हिन, मायकल वॅन लिंगन, जान फ्रायलिनकक, जे जे स्मिट, जेन ग्रीन, डेव्हिड विसे, रूबेन ट्रम्पलमॅन, बर्नार्ड शोल्टज, जॅक ब्रासेल, बेन शिकोंगो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *