AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम ! सुपर-८ मध्ये धडक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुन ।। AFG vs PNG Live Match Updates In Marathi : ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ मधील २९ व्या सामन्यात अफगाणिस्तान आणि पापुआ न्यू गिनी हे संघ भिडले. नवख्या संघाचा दारूण पराभव करून अफगाणिस्तानने विजयाची हॅटट्रिक लगावली. यासह अफगाणिस्तानने सुपर-८ मध्ये प्रवेश केला. राशिद खानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिस्पर्धी पापुआ न्यू गिनी संघाला अवघ्या ९५ धावांत गुंडाळून अफगाणिस्तानने सुपर-८ च्या दिशेने कूच केली. त्यांना सुपर-८ मध्ये प्रवेश करण्यासाठी अवघ्या ९६ धावांची आवश्यकता होती, या आव्हानाचा सहज पाठलाग करताना अफगाणिस्तानने मोठा विजय साकारला. ब्रायन लारा क्रिकेट अकादमी येथे हा सामना पार पडला.

पापुआ न्यू गिनीने दिलेल्या ९६ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने १५.१ षटकांत ३ बाद १०१ धावा केल्या. यासह राशिदच्या संघाने ७ गडी आणि २९ चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. अफगाणिस्तानकडून गुलाबदीन नायबने सर्वाधिक नाबाद (४९) धावा केल्या.

तत्पुर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिस्पर्धी पापुआ न्यू गिनी संघाला अवघ्या ९५ धावांत गुंडाळले. पापुआ न्यू गिनी संघाकडून यष्टीरक्षक फलंदाज किप्लिन डोरिगा (२७) वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी आजही कमाल करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारूकीने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर नवीन-उल-हक (२) आणि नूर अहमदने (१) बळी घेतला. पापुआ न्यू गिनीचे तब्बल चार फलंदाज धावबाद झाले. अखेर पापुआ न्यू गिनीचा संघ १९.५ षटकांत केवळ ९५ धावांत गारद झाला. ९६ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने सहज विजय मिळवला.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या विजयामुळे न्यूझीलंडचे यंदाच्या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड हे संघ क गटात आहेत. या गटातून सुपर-८ साठी पात्र ठरणारा वेस्ट इंडिज पहिला संघ ठरला. त्यांनी तीनपैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला. दुसरीकडे न्यूझीलंडने दोनपैकी दोन्ही सामने गमावले आहेत. अफगाणिस्तानने तीनपैकी सर्व तीन सामने जिंकून सहा गुणांसह सुपर-८ मध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता न्यूझीलंडने उर्वरीत दोन सामने जिंकले तरी त्यांना सुपर-८ ची फेरी गाठता येणार नाही. त्यामुळे किवी संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर-८ साठी पात्र ठरणार आहेत, त्यानुसार क गटातून यजमान वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी ६-६ गुणांसह पात्रता फेरी गाठली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *