तुपात भेसळ; चिराबाजार येथील दुकानावर कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुन ।। भेसळ केलेले तूप नामांकित कंपनीच्या नावाने विकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या चिराबाजार येथील एका दुकानावर कारवाई करण्यात आली. पोलीस, एफडीएचे पथक व अमूल कंपनीच्या प्रतिनिधींनी संयुक्तरीत्या धडक देऊन त्या दुकानात सुरू असलेला काळाबाजार उधळून लावला.


चिराबाजार येथील एका दुकानात अमूल, क्रिष्णा आणि सागर अस्सल तूप या कंपनीच्या नावाने भेसळ केलेले तूप नागरिकांना विकले जात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार या पथकाने खातरजमा केली असता त्या दुकानात सर्रासपणे तुपात भेसळ केली जात असल्याचे निष्पन्न झाले. याची तत्काळ गंभीर दखल घेत या पथकाने एफडीए अधिकारी आणि अमूल कंपनीच्या प्रतिनिधींना सोबतीला बोलावून त्या दुकानावर छापा टाकला. त्यावेळी तेथे पाम व वनस्पती तेल, कृत्रिम रंग आणि चवीचे लोणी वापरून भेसळ केलेले तूप बनवले जात असल्याचे आढळून आले. शिवाय ते भेसळ केलेले तूप अमूल, क्रिष्णा आणि सागर या नामांकित कंपनीच्या नावाने विक्रीसाठी दिले जात असल्याचेदेखील आढळून आले. त्यामुळे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या सूचनेनुसार पथकाने मालामाल होण्यासाठी तुपात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या चमन यादव (40) आणि झामन यादव (55) या दोघा भावांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांनाही पुढील कारवाईसाठी एलटी मार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. शिवाय पोलिसांनी घटनास्थळावरून 780 लिटर भेसळ केलेले तूप, 425 कंपनीच्या नावाच्या पिशव्या आदी साहित्य जप्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *