ही मानसिकता कधी बदलणार ?! तो तिच्यावर वार करत होता आणि लोकं बघत राहिली… वसई हादरली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुन ।। वसईत दिवसा-ढवळ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तरुणीवर लोखंडी पान्याने वारंवार वार केले. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. वसई पूर्व येथील चिंचपाडा परिसरात मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबईनजीकच्या शहरात अशा प्रकारची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे तरुण तिच्यावर वार करत असताना नागरिक हे दृश्य पाहूनही काहीच न घडल्यासारखे पुढे जात होते. कोणीच आरोपीला थांबवले नाही.

दोन वर्षांचे नाते तुटले, दोघांचे ब्रेकअप झाले याच रागात आरोपी होता. गेल्या काही वर्षांपासून ते शेजारी शेजारी राहत होते. गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्यात वाद-विवाद होते. त्यामुळं त्यांचे ब्रेकअप झाले. पण आरोपीला संशय होता की तरुणीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध होते. त्याच रागातून आरोपीने तिच्यावर इंडस्ट्रीअल पान्याने वार केले. आरोपीने तिच्यावर तब्बल 15-16 वार केले. या हल्ल्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आले आहेत. मुलीवर वार होत असताना एकाही नागरिकाने पुढे येऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. काही नागरिक फक्त बघ्याची भूमिका घेत होते. जर नागरिकांनी आरोपीला विरोध केला असता तर आज कदाचित ती तरुणी जिवंत असती.

सीसीटिव्ही फुटेजमध्ये, पीडीत तरुणी रस्त्यावरुन जात असताना आरोपी मागून येतो आणि तिच्या डोक्यात वार करतो. त्यानंतर ती खाली कोसळल्यानंतर तो आणखी तीव्रतेने तिच्यावर वार करतो. तो वार करत असताना सुरुवातीला एक गृहस्थ त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तो त्यांनाही न जुमानता तिच्यावर वार करणे सुरूच ठेवतो. मात्र हा प्रकार पाहून आजूबाजूला जमलेले लोक फक्त घडलेला प्रकार बघत असतात. तर, काही नागरिक लोक ये-जा करताना दिसत आहेत. परिसर गजबजलेला आहे आरोपी तिच्यावर वार करतोय तरीदेखील लोक हे दृश्य पाहत पाहत पुढे जात आहेत. मात्र कोणीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा पोलिसांना याबाबत माहितीही कळवली नाही. लोकं दुर्लक्ष करुन पुढे निघून जात होते. लोकं गुन्हा घडताना पाहून आरामात दुर्लक्ष करुन पुढे निघून जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *