Team India : वर्ल्ड कपनंतर ‘या’ दिग्गजांचा पत्ता कट… या 7 खेळाडूंची होणार टीम इंडियात एंट्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १९ जुन ।। Team India Tour Zimbabwe and Sri Lanka : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विजेत्या ठरलेल्या कोलकता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीर लवकरच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार असतानाच कोलकता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याचेही टीम इंडियात पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय संघ जुलै – ऑगस्ट महिन्यात श्रीलंकन संघाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची भारतीय संघात निवड होईल, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून याप्रसंगी देण्यात आली.

स्थानिक क्रिकेटला महत्त्व न दिल्यामुळे बीसीसीआयकडून श्रेयस अय्यर व इशान किशन यांना केंद्रीय करारातून वगळण्यात आले होते. त्यानंतर श्रेयसच्या नेतृत्वात कोलकता संघाने आयपीएलच्या जेतेपदावर मोहर उमटवली. श्रेयसने मागील वर्षी भारतात झालेल्या एकदिवसीय विश्‍वकरंडकात ५०च्या सरासरीने ५००च्यावर धावा फटकावल्या आहेत. त्यामुळे त्याला भारतीय संघातून वगळण्यात येऊ शकत नाही. श्रीलंकन संघाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्याची निवड होईल, असे सूत्रांकडून पुढे स्पष्ट सांगण्यात आले.

आयपीएल स्टार झिम्बाब्वेला जाणार
एप्रिल – मे महिन्यात पार पडलेल्या आयपीएलमध्ये भारतातील युवा खेळाडूंनी चमकदार खेळ केला. यामध्ये अभिषेक शर्मा, रियान पराग, मयंक यादव, हर्षित राणा, नितीश रेड्डी, विजयकुमार वैशाख, यश दयाल या खेळाडूंचा समावेश होता. त्यामुळे आगामी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी या युवा खेळाडूंची निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोहली, रोहित, बुमराला विश्रांती
विराट कोहली, रोहित शर्मा व जसप्रीत बुमरा या प्रमुख खेळाडूंना टी-२० विश्‍वकरंडकानंतर विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. आगामी काही महिन्यांमध्ये भारतीय संघ नऊ कसोटी सामने खेळणार आहे. तसेच चॅम्पियन्स एकदिवसीय करंडकाचेही आयोजन करण्यात येणार आहे. एकदिवसीय व कसोटी या दोन प्रकारांमध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त राहता यावे, यासाठी या तीनही खेळाडूंना श्रीलंका व झिम्बाब्वे या दोन मालिकांमधून विश्रांती देण्यात येईल.

तसेच हार्दिक पंड्या व सूर्यकुमार यादव यांना विश्रांती न दिल्यास याच दोघांकडे कर्णधारपद व उपकर्णधारपद सोपवण्यात येईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *