महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुन ।। सुपर-८ चा दुसरा सामना यजमान वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात पार पडला. हा सामना जिंकून इंग्लिश संघाने मिळालेल्या संधीचे सोने केले. खरे तर जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंडला अपघाताने सुपर-८ चे तिकीट मिळाले. स्कॉटलंडच्या तोंडचा घास पळवून ऑस्ट्रेलियन संघाने इंग्लिश संघाला पुढच्या फेरीत पोहोचण्यासाठी मदत केली. वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील बहुचर्चित सामना सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. विडिंजने १८१ धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना गतविजेत्यांनी सहज विजय मिळवला. इंग्लंडकडून फिल साल्टने ५ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ४७ चेंडूत ८७ धावांची नाबाद खेळी केली आणि इंग्लिश संघाने ८ गडी आणि १५ चेंडू राखून विजय मिळवला.
जोस बटलरच्या संघाने १७.३ षटकांत २ बाद १८१ धावा करून सहज विजय मिळवला. फिल साल्टशिवाय जॉनी बेयरस्टोने चांगली खेळी केली, त्याने २ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने २६ चेंडूत नाबाद ४८ धावा केल्या. यजमानांकडून आंद्रे रसेल (१) आणि रोस्टन चेस (१) वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही.
तत्पुर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्यात वेस्ट इंडिजच्या संघाला यश आले. सुरुवातीला स्फोटक खेळी केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या सुस्साट गाडीला ब्रेक लावण्यात इंग्लंडला यश आले. अखेर यजमान संघ निर्धारित २० षटकांत ४ बाद १८० धावा करू शकला. त्यामुळे इंग्लंडला सुपर-८ मध्ये विजयी सलामी देण्यासाठी १८१ धावांची गरज होती. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी स्फोटक खेळी केली. पण, दुखापतीमुळे किंगला रिटायर्ड हर्ट तंबूत परतावे लागले. त्यानंतर इंग्लिश गोलंदाजांना पुनरागमन करता आले. यजमानांनी ९४ धावांवर आपला पहिला गडी गमावला. मग सांघिक खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने तगडी धावसंख्या उभारली. यजमानांकडून ब्रँडन किंग (२३), जॉन्सन चार्ल्स (३८), निकोलस पूरन (३६), रोवमन पॉवेल (३६) आणि शेरफेन रूदरफोर्डने नाबाद २८ धावा केल्या. तर इंग्लिश संघाकडून गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मोईन अली आणि लियाम लिव्हिंस्टोन यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
वेस्ट इंडिजचा संघ –
रोवमन पॉवेल (कर्णधार), ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन, रोस्टन चेस, शेरफेन रूदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमारियो शेफर्ड, अकिल हुसैन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती.
इंग्लंडचा संघ –
जोस बटलर (कर्णधार), फिलिप साल्ट, जॉनी बेयरस्टो, हॅरी ब्रुक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड, रीस टॉपले.