महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुन ।। नागपूरच्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता नागपूरकर तुमच्या मोबाईलवरून व्हॉट्सअँपवरुनच तुमच्या मेट्रोची तिकीट बुक करू शकणार आहेत. लोकप्रियता वाढलेल्या व्हॉट्सअँपचा वापर आता नागपूरच्या मेट्रोने केला असून त्यांनी AI चॅटबॉटवर आधारित तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. या सोईस्कर सेवेमुळे प्रवासी आता त्यांच्या प्रवासासाठी अगोदर तिकीट बुक करू शकतात.
ही सुविधा हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तेलगू या चार भाषांमध्ये उपलब्ध आहे. याचा फायदा घेण्यासाठी फक्त +91 8624888568 या क्रमांकावर ‘Hi’ पाठवा किंवा दिलेला QR कोड स्कॅन करा. या सोप्या चॅटबॉटवर तुम्ही तुमची तिकीट बुक करू शकता, रिअल-टाइम माहिती मिळवू शकता आणि थेट व्हॉट्सअँपवरून प्रवासाविषयी आवश्यक माहिती मिळवू शकता.
नियमित प्रवाशांसाठी या सेवेमध्ये एक खास ‘क्विक पर्चेस’चा पर्याय आहे. या पर्यायामुळे तुम्ही तुमची नेहमीची रूट्स सेव्ह करू शकतात आणि तिकीट बुकिंग करताना वेळ वाचवू शकता. ही सोईस्कर सेवा तुम्हाला एका वेळी 6 सिंगल जर्नी तिकीट किंवा 40 प्रवाशांपर्यंतच्या ग्रुप तिकीट बुक करण्याची सुविधा देते.
ज्युरनच्या सार्वजनिक परिवहनात गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअँपचा वापर वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि वापरण्यास सुलभ असा अनुभव मिळतो. नागपूर मेट्रोमध्ये ही सेवा सुरू झाल्याने सार्वजनिक परिवहनाचे आधुनिकीकरण होणार असून आता दैनिक प्रवाशांना त्यांच्या प्रवासात अधिक सोय होणार आहे.
“नागपूर मेट्रोमध्ये व्हॉट्सअँपद्वारे QR तिकीट सेवा सुरू झाल्याने लाखो प्रवाशांना अधिक परिष्कृत आणि बुद्धिमान प्रवास अनुभव मिळणार आहे.” असे मेटा इंडियामधील बिझनेस मेसेजिंगचे डायरेक्टर रवि गर्ग यांनी सांगितले. तसेच, “या सहकार्यामुळे आम्ही देशभरातील प्रवाशांसाठी परिवहनाचा अनुभव सोपा करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. आता ते व्हॉट्सअँप चॅटमध्येच त्यांची कामे पूर्ण करू शकतात,असे ते म्हणाले.”
देशातील अधिकाधिक शहरे सार्वजनिक परिवहनासाठी डिजिटल पर्यायांचा अवलंब करत असून स्मार्ट, कार्यक्षम आणि प्रवासीकेंद्री परिवहन प्रणालीकडे वाटचाल आहेत. त्यामुळे भारतातील शहरी परिवहनाची नवी मानके तयार होण्याची दिशा उघडली आहे.