SA vs AFG : 2 तासात अफगाणिस्तानचा सुफडा साफ ; दक्षिण आफ्रिका चोकर्स शिक्का पुसत फायनल मध्ये

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जुन ।। South Africa vs Afghanistan, Semi Final 1 : दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 वर्ल्ड कप 2024चा सेमीफायनल सामना जरा हाय व्होल्टेज होईल असे वाटले होते, पण अवघ्या दोन तासात सामना संपला. होय भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजता सामन्याचा पहिला चेंडू खेळला गेला आणि फक्त दोन तास म्हणजे आठ वाजता सामना संपला. अफगाणिस्तानला हरवून दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीत धडक मारली.

त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा 9 विकेट्सने पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे.

वर्ल्ड कपच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने फायनलमध्ये प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे या पराभवाने अफगाणिस्तानचे स्वप्न भंगले आहे. त्यांचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास खूप चांगला होता पण संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिबात टक्कर देऊ शकला नाही.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा संघ 11.5 षटकात केवळ 56 धावांवर ऑलआऊट झाला. दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी मिळून अफगाण संघाचा खेळ खल्लास केला. प्रत्युत्तरात आफ्रिका संघाने हे लक्ष्य 9व्या षटकातच गाठले.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला. पहिल्याच षटकात संघाला मोठा फटका बसला. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज खाते न उघडताच बाद झाला. दुसरा सलामीवीर इब्राहिम झद्रानही अवघ्या 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर बाकीचे फलंदाजही विशेष काही करू शकले नाहीत.

गुलबदिन नायबने 9 धावा केल्या आणि अजमतुल्ला उमरझाई 10 धावा करून बाद झाला. ओमरझाईने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. यावरून अफगाणिस्तानची फलंदाजी किती वाईट होती याचा अंदाज लावता येतो. अनुभवी फलंदाज मोहम्मद नबीला खातेही उघडता आले नाही. करीम जनात आणि कर्णधार राशिद खान यांनी प्रत्येकी 8 धावा केल्या. अफगाणिस्तानला 13 धावा अतिरिक्त मिळाल्या. या धावा झाल्या नसत्या तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती.

मार्को यानसेनने 3 षटकात 16 धावा देत 3 बळी घेतले. कागिसो रबाडाने 14 धावांत 2 विकेट्स घेतल्या आणि ऍनरिक नॉर्टजेने 3 षटकांत केवळ 7 धावांत 2 बळी घेतले. तबरेझ शम्सीनेही अवघ्या 6 धावांत 3 बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवातही चांगली झाली नाही. क्विंटन डी कॉक दुसऱ्याच षटकात केवळ 5 धावा काढून बाद झाला. मात्र, यानंतर एडन मार्कराम आणि रीझा हेंड्रिक्स यांनी सावध फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *