IND vs ENG: इंग्लंड चा धुव्वा उडवत टीम इंडियाचा फायनल प्रवेश ; रोहित शर्माचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। IND vs ENG Highlights: भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारताच्या अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकीच्या जोडीपुढे इंग्लंडचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. या दोघांनीही प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. याशिवाय भारताच्या विजयात कर्णधार रोहित शर्माचीही भूमिका महत्त्वाची होती. रोहित शर्माने उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर अनेक वक्तव्ये केली आहेत. टीम इंडियाने १० वर्षांनंतर टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. जिथे त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

रोहित शर्मा भारताच्या विजयानंतर काय म्हणाला
इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला की, “हा सामना जिंकल्याचं खूप समाधान आहे. आम्ही एक युनिट म्हणून खूप मेहनत घेतली. हा सामना जिंकण्यासाठी सर्वांनीच खूप प्रयत्न केले. आम्ही परिस्थितीशी खूप चांगले जुळवून घेतले. तेथील परिस्थितीशी जुळवून घेणं हे एक आव्हान होतं पण आम्ही या परिस्थितीशी जुळवून घेतलं आणि या टूर्नामेंटमधील विजयाचं हेच मोठं कारण आहे. गोलंदाज आणि फलंदाजांनी परिस्थितीशी जुळवून घेत कामगिरी केली तर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो, जसं की आज घडलं. आम्ही ज्याप्रकारे या सामन्यात विजय मिळवला ते पाहून मी खूप आनंद होतोय.”

या सामन्यातील धावसंख्येबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, “एका वेळी१४०-१५० धावा पुरेशा वाटत होत्या, पण जसजसा खेळ पुढे सरकत गेला आणि ज्याप्रमाणे मी आणि सूर्याची भागीदारी पाहता आम्ही आणखी २५ धावा केल्या पाहिजेत असं मला वाटलं. मी माझ्या मनात लक्ष्य निश्चित केलं होतं, परंतु मला त्याबद्दल कोणालाही सांगायचे नव्हते कारण ते सगळे सहजतेने खेळणारे फलंदाज आहेत आणि त्यांना मैदानात जाऊन कोणताही दबाव न घेता मुक्तपणे फलंदाजी करावी असे वाटत होते. आम्ही परिस्थिती समजून घेत चांगली फलंदाजी केली आणि त्याचा निकाल समोर होता आम्ही १७० धावा केल्या. या खेळपट्टीवर १७० हा खूप चांगला स्कोअर आहे असं माझं मत होतं आणि गोलंदाज तर कमाल होते.”

अक्षर आणि कुलदीपच्या गोलंदाजीबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “ते उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. काही फटके खेळणे अवघड आहे, कुलदीप-अक्षरवरही दडपण होते की अचूक गोलंदाजी कशी करायची, पण ते शांत राहिले आणि त्यांना काय गोलंदाजी करायची हे माहीत होते. आम्ही पहिल्या डावानंतर चर्चा केली तेव्हा ठरलं की शक्य तितकं स्टंप्सवर सर्वाधिक मारा करत राहा.”

विराट कोहलीबाबत रोहित शर्मा म्हणाला की, “कोहली एक उत्कृष्ट खेळाडू आहे. कोणताही खेळाडू खराब फॉर्ममधून जाऊ शकतो. त्याची खेळण्याची पध्दत आणि अशा मोठ्या सामन्यांमधील त्यांचे महत्त्व आम्हाला माहित आहे. १५ वर्ष खेळलेल्या खेळाडूसाठी फॉर्म हा चिंतेचा विषय नाही. त्याने सर्वोत्तम खेळी फायनलसाठी राखून ठेवली असावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *