Weather Forecast : राज्यात या ठिकाणी आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता; वाचा वेदर रिपोर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जुन ।। सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. काही ठिकाणी पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग आला असून बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, पुढील ३-४ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.


मुंबईसह उपनगर, रायगड, ठाणे पुणे या जिल्ह्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.

कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर पुण्यातही हलका पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची (Rain Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) वाहू शकतो. वीज कोसळण्याची दाट शक्यता असल्याने नागरिकांनी झाडाखाली थांब नये, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे.

मान्सूनने व्यापला गुजरात
संपूर्ण राज्याला व्यापणाऱ्या मान्सूनने आता मजल-दरमजल करत उत्तरेकडे आपला प्रवास सुरू केला आहे. गुरुवारी (ता. २७) मान्सूनने गुजरात व्यापला असून छत्तीसगड, ओडिशा, मध्य प्रदेश उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख बहुतांश भाग, बिहार, उत्तर प्रदेशाकडे कूच केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत देशाच्या बहुतांश भागात मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *