IND vs SA, Weather Update: आज फायनलचा थरार ; बारबाडोसमध्ये पाऊस खेळ बिघडवणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जुन ।। आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना आज(२९ जून) बारबाडोसमध्ये रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ ट्रॉफी जिंकण्यासाठी दोन हात करताना दिसून येणार आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सेमिफायनलमध्ये इंग्लंडला धुळ चारत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

तर पहिल्या सेमिफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा एकतर्फी पराभव केला आणि फायनलचं तिकीट मिळवलं आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु होणार आहे. तर भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरु होईल. दरम्यान या सामन्यावर पावसाचं सावट असणार आहे.

बारबाडोसमध्ये कसं असेल हवामान?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,सामन्यावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा सामना पूर्ण दिवस सुरु राहिल असं म्हटलं जात आहे. या सामन्याचं नाणेफेक सकाळी १० वाजता होईल. त्यानंतर १०:३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान सकाळी १० वाजता पाऊस पडण्याची शक्यता ही ५५ टक्के इतकी असणार आहे. तर दुपारी १२ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ७२ टक्के इतकी असेल. त्यानंतर दुपारी ३ वाजता पाऊस पडण्याची शक्यता ४८ टक्के इतकी असणार आहे.

यापूर्वी झालेल्या पहिल्या सेमिफायनलसाठी आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली होती. तर दुसऱ्या सेमिफायनलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला नव्हता. या सामन्यातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून आयसीसीने अतिरिक्त ४ तास राखीव ठेवले होते. मात्र फायनलच्या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवसाची घोषणा केली आहे.

फायनलचा सामना २९ जून रोजी होणार आहे. मात्र यादिवशी सामना होऊ शकला नाही,तर दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० जून रोजी हा सामना खेळवण्यात येईल. या दिवशीही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दिवशी जर पाऊस आला आणि सामना रद्द झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केलं जाईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *