T20 World Cup 2024 : हे आहेत टीम इंडियाच्या विजयाचे खरे हिरो ? शोएबने सांगितलं ‘या’ खेळाडूंच नाव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० जुन ।। दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडियाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवले. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अभूतपूर्व कामगिरी करत तब्बल ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफिचा दुष्काळ संपवला. या विजयानंतर आता टीम इंडियाचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. पाकिस्तानचा माजी वेगवाग गोलंदाज शोएब अख्तरने देखील भारतीय संघाला विजयाची शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या युट्यूब चॅनलवरून टीम इंडियाचे अभिनंदन करताना शोएब अख्तर म्हणाला, “मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की, टीम इंडियाच हा टी-२० विश्वचषक जिंकेल. कारण, त्यांनी संपूर्ण स्पर्धेत अतिशय चांगला खेळ केला. २०२३ मधील एकदिवसीय विश्वचषकाचा खरा मानकरी भारतीय संघच होता”.

“कारण त्यांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. पण अंतिम सामन्यात काही चुका झाल्याने टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, मागचा पराभव विसरून भारतीय संघ या विश्वचषकात पुन्हा नव्या जोशात उतरला होता, असं शोएब अख्तर म्हणाला.

रोहित शर्माने संपूर्ण टी-२० विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली. त्याने एकजुटीने संघ बांधत टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचवले, असं म्हणत शोएबने रोहित शर्माचे कौतुक केले. एकवेळ टीम इंडियाच्या हातातून हा सामना निसटला होता. पण गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या हातून सामना खेचून आणल्याचं शोएब म्हणाला.

टीम इंडियाचा विजय कुणामुळे झाला?
शोएब अख्तरने टीम इंडियाच्या विजयाचे श्रेय 4 खेळाडूंना दिले. तो म्हणाला, की “नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा रोहितचा निर्णय चांगला होता. त्यांना सुरुवातही चांगली मिळाली. पण एकापाठोपाठ एक दोन धक्के बसल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला. त्याचवेळी विराटने इतर खेळाडूंच्या मदतीने संयमी खेळी करत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढत समाधानकारक धावसंख्या उभारून दिली”.

त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. एकवेळ दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. पण बुमराह, त्यानंतर हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंहने हा सामना पुन्हा टीम इंडियाकडे खेचून आणल्याचं शोएब म्हणाला. टीम इंडियाच्या विजयाचे हिरो, विराट, कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप असल्याचं शोएबने म्हटलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *