महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट-पुणे येथे सुरु असलेल्या मेट्रो कामाची पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पहाणी केली. मेट्रोच्या कामात कोरोना लॉकडाऊन नंतरच्या दिरंगाईबाबत त्यांनी संचालकांसमोर नाराजी व्यक्त केली. तसेच पररराज्यातील स्थलांतरीत कामगारांमुळे कामगार कमी पडत असतील तर; स्थानिक कामगारांना रोजगार द्याल अशा सूचना आ. बनसोडे यांनी मेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांना केल्या.
मेट्रोच्या कामाची आ. बनसोडे यांनी नुकतीच पाहाणी केली. यावेळी त्यांच्या असे निदर्शनास आले की, मेट्रोचे काम कोरोना काळापुर्वी अत्यंत जलदगतीने होते. परंतु; आता खुपच संथ गतीने काम सुरु आहे. असे झाल्यास मंजुरी मिळालेल्या पिंपरी ते निगडी या मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम लवकर कसे होणार? त्यामुळे त्यांनी मेट्रोच्या संचालक व अन्य अधिकार्यांबरोबर बैठक घेतली. यावेळी संचालक दीक्षित, सहसंचालक रामनाथन सुब्रम्हण्यम, नियोजन अधिकारी संतोष पाटील आदि उपस्थित होते.
मेट्रोच्या संथ गतीच्या कामाबाबत आ. बनसोडे यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर मेट्रोच्या अधिकार्यांनी एकूण कामगारांपैकी 90 टक्के कामगारांनी कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्यानंतर स्थलांतर केले. त्यामुळे कामगारांच्या कमतरतेमुळे काम संथ गतीने होत आहे, असे सांगितले.
त्यावर बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, मेट्रोच्या कामासाठी कुशल व अकुशल कामगारांची आवश्यकता असल्यास स्थानिक कामगारांना रोजगार द्या. कामगार मिळत नसतील तर आम्ही कामगार पुरवू. परंतु; मेट्रोचे काम जलदगतीने करा.मेट्राचे काम ठरलेल्या वेळेत लवकरात लवकर करर्यासाठी प्रयत्न करा. पिंपरी ते निगडी या वाढीव कामासाठी राज्य सरकारने सुमारे 1500 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.