महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. 3 जुलै ।। मान्सूननं टप्प्याटप्प्यानं आता संपूर्ण देश व्यापला असून, सध्या देशाच्या पंजाबपासून मणिपूरपर्यंत पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. इथं महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत पावसानं जोरदार हजेरी लावली असून, किनारपट्टी भागांमध्येसुद्धा पावसाची समाधानकारक हजेरी पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या कोकण पट्ट्यासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये या भागात पावसाचा जोर वाढताना दिसेल.
हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईच्या किनारपट्टी भागासह सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकच्या घाटमाथ्यावर ढगांची दाटी आणि पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असेल. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असला तरीही त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरणार असल्यामुळं आता एक नवी चिंता डोकं वर काढताना दिसत आहे. तेव्हा येत्या काही दिवसांमध्ये ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार असं म्हणायला हरकत नाही.