Maharashtra Rain Update: राज्यात कोसळधार! कोकणात पावसाची तुफान बॅटींग ; नदी-नाल्यांना पूर; शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुलै ।। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून तुफान पाऊस पडत आहे. या पावसामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झाले आहे. लोकसेवा विस्कळीत, रस्त्यावर पाणीच पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहेत. अशामध्ये मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. जल्ह्यातील सर्व शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप, विद्याविहार, कुर्ला आणि सायन रेल्वे स्थानकात पाणी साचल. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी जाणारी रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. लोकलसेवा उशिरा असल्यामुळे लोकलला देखील प्रचंड गर्दी आहे. अशामध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना ऑफिसमध्ये लेटमार्क लागणार आहे. या पावसाचा फटका फक्त लोकलसेवेलाच नाही तर एक्स्प्रेसला देखील बसला आहे. कोल्हापूरहून मुंबईला येणारी एक्स्प्रेस अंबरनाथमध्ये रखडली आहे. मुंबईत रेल्वेसेवा बंद असल्याने अंबरनाथच्या सायडिंगला एक्स्प्रेस उभी आहे.

नवी मुंबईत देखील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हार्बर रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे. कुर्ला रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वे सेवा विस्कळित झाली आहे. पनवेल ते वाशी लोकलसेवा सुरू आहे. मात्र वाशी ते सीएसएमटी लोकलसेवा ठप्प झाली आहे. वाशी रेल्वे स्थानकात मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दोन तास प्रवासी लोकलची वाट पाहत आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये देखील मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. हे पाणी दुकानांमध्ये शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरीत मध्यरात्रीपासून पाऊस थांबल्यामुळे जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. पण जिल्ह्यातील सर्वच नद्या अद्यापही इशारा पातळीवर आहेत. काजळी, अर्जुना, कोदावली, शास्त्री , मुचकुंदी नदी सध्या इशारा पातळीवर आहेत. तर खेडची जगबुडी नदी अद्यापही धोका पातळीवर आहे. हवामान विभागाकडून आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी – राजापूरमध्ये अद्यापही गावांमध्ये आलेल्या पुराचं पाणी तसेच आहे. अर्जूना आणि कोदवली नदिची पुरस्थिती कायम आहे. जवाहर चौकात अजूनहू पुराचं पाणी आहे. जवाहर चौकात काल ५ फुटांपेक्षा अधिक पाणी होतं. राजापूर बाजारपेठ रविवारी पाण्याखाली गेली होती. दुकानातील माती काढून व्यापाऱ्यांकडून साफ सफाई केली जात आहे. सिंधुदुर्गमधील मुंबई- गोवा महामार्ग अद्याप ठप्पच आहे. पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे मुंबई आणि गोव्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. काल सायंकाळपासून मुंबई गोवा महामार्ग ठप्प होता. पूराचे पाणी साचल्यामुळे दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

अलिबागच्या नेहूली, खंडाळा, भिलजी, बोरघर, रामराज परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पावसामुळे नाल्याचे पाणी गावात शिरले आहे. गावातील घरांमध्ये दीड फुटापर्यंत पाणी साचले आहे. अलिबाग तालुक्यातील नेहुली खंडाळा, भिलजी, बोरघर, रामराज परिसरात मध्यरात्री १ ते पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. घरातील अन्नधान्य आणि अन्य चीजवस्तू भिजून नुकसान झाले. पावसामुळे गावाजवळचा नाला ओसंडून वाहू लागला आणि त्याचे पाणी गावात शिरले. गावातील रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *