Pune Accident News : पुण्यात पुन्हा हिट अँड रन ; अज्ञात वाहनाने मध्यरात्री दोन पोलिसांना चिरडलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ जुलै ।। पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील पोर्श कार अपघाताची घटना ताजी असताना शहरात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना उडवलं. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

समाधान कोळी असं मृत पोलीस (Pune Police Accident) कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर पी.सी शिंदे असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पळून गेला असून सध्या पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, समाधान कोळी आणि पी.सी शिंदे हे बीट मार्शल म्हणून रविवारी मध्यरात्री गस्तीवर होते. हॅरिस ब्रीज बोपोडीजवळ (Pune Hit and Run News) दोघेही दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता, की यात समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिंदे हे गंभीर जखमी झाले. दरम्यान, स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले.

गंभीर जखमी असलेल्या शिंदे यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर समाधान कोळी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *