महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। एकीकडे राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलेला असतानाच आता साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. नाशिक शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून आठवडाभरात ९६ नवे रुग्ण आढळल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये डेंग्यूच्या रोगाने डोकेदुखी वाढवली असून या आठवडाभरात ९६ नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबतच डेंग्यूच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा ३६५ वर पोहचला असून शहरातील सिडको विभागात डेंग्यूचे सर्वाधिक ३८ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर नाशिकरोड विभागात २१, नाशिक पूर्व विभागात १५, नाशिक पश्चिम आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १० तर सातपूर विभागात २ रुग्ण आढळलेत.
डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सरकारी रुग्णालयांपेक्षा खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असून रुग्णसंख्या वाढल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. पालिका प्रशासनाकडून डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे तर डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या आस्थापना, व्यक्तींना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.