महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जुलै ।। भारतीय हवामान खात्याने आज राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे आणि कोकणातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आजच्या (९ जुलै २०२४) सकाळ आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.
दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून थोडीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सखल भागात साचलेले पाणी ओसरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई लोकल ट्रेनची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.