महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. ती रोखण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी योग्य ती खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. आपल्या आमदारांच्या बैठका आणि त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी पक्षांनी मोठी तयारी केली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांच्या सोईसुविधांवर तगडा खर्च होत असल्याचं चित्र आहे. मतांची फुटाफूट टाळण्यासाठी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे, मात्र या निवडणुकीत मतांची जुळवाजुळव करताना आपल्या पक्षाचे आमदार फुटू नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष आणि काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी त्यांच्या आमदारांची व्यवस्था येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. यासाठी लाखोंचा खर्च देखील करण्यात येत असल्याचं चित्र आहे.
या आमदारांना ठेवलेल्या हॉटेलचे भाडे हे १२ ते २५ हजार रूपये इतकं आहे. हा संपुर्ण खर्च कोण करणार असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
.
कोणत्या पक्षांचा किती खर्च?
भाजप आमदारांचा मुक्काम हा हॉटेल प्रसिडेंटमध्ये आहे. त्या हॉटेलचं दिवसाचं भाडं हे १५ ते २० हजार रूपये इतकं आहे. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा मुक्काम हा ताज लॅण्ड्स एंडमध्ये आहे त्याचं दिवसाचं भाडं हे १५ ते २५ हजार रूपये इतकं आहे.
तर ठाकरे गटाचे आमदार हे ITCमराठा या हॉटेलमध्ये थांबले आहेत. याचं भाडं हे १२ हजार ते १५ हजार रूपये इतकं आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार थांबलेल्या द ललीत हॉटेलचं भाडं देखील दिवसाला १५ हजार ते २० हजार रूपये इतकं आहे.
आमदारांच्या या हॉटेलचा खर्च कोण उचलणार अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पंचतारांकित हॉटेलचा खर्च हा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्ही मराठीने दिले आहे.
१२ तारखेला विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. ११ जागांसाठी १२ जणांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होऊ नये त्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पाऊले उचचली आहेत. आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. काँग्रेसने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. ठाकरे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना या पक्षांनी आपले आमदार हॉटेलवरती हलवले आहे.
भाजपने आमदारांची भरवली शाळा; कागदावर मतदान करत रंगीत तालीम
विधानपरिषद निवडणुकीत फुटाफुट होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने सावध पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आमदारांची विधीमंडळात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्या(१२) होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
भाजपच्या 5 उमेदवारांना कोणत्या आमदारांनी कोणत्या पसंतीचं मते द्यावीत? मतदान कसे करावे? याबाबतच्या सूचना देखील आमदारांना देण्यात आल्या आहेत. यावेळी आमदारांची कोऱ्या कागदावर मतदान करुन रंगीत तालीमही घेतली. मत वाया जाणार नाही, बाद होणार नाही, यासाठी काळजी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
आमदारांची व्यवस्था
शिवसेना : ताज लँड्स एन्ड (वांद्रे)
राष्ट्रवादी काँग्रेस : हॉटल ललित (विमानतळ)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : आयटीसी ग्रँड मराठा (परळ)
भाजप : प्रेसिडेंट हॉटेल (कफ परेड)
विधान परिषदेसाठी उमेदवार
भाजप : पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके,
अमित गोरखे, सदाभाऊ खोत
शिवसेना (शिंदे गट ): भावना गवळी, कृपाल तुमाने
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे
काँग्रेस : डॉ. प्रज्ञा सातव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : मिलिंद नार्वेकर
शेकाप : जयंत पाटील