महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास महिना झाला. मात्र, आरटीई प्रवेशाची शाश्वती नसल्यामुळे अर्ज केलेल्या पालकांनी आता मनासारख्या शाळेत पैसे भरून प्रवेश घेतले. आता आरटीईचा निकाल लागला तरी प्रवेश मिळेल का? याची आशादेखील पालकांना उरलेली नाही.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाच्या वतीने आरटीईअंतर्गत खासगी इंग्रजी शाळेत २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राबविली जाते.
यंदा मात्र शिक्षण विभागाने आरटीई प्रक्रियेच्या नियमात बदल केला. याविरोधात पालकांनी न्यायालयात दाद मागितली. प्रकरण न्यायालयात गेल्यामुळे सध्या आरटीई प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे. त्यात न्यायालयाच्या निर्देशानुसार दुसऱ्या वेळी प्रवेश प्रक्रिया राबवून शासकीय शाळा वगळून पुन्हा गतवर्षीप्रमाणे प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली होती.
त्यानंतर प्रकरण पुन्हा न्यायालयात गेल्यानंतर पुढील प्रक्रिया थांबली. राज्यस्तरावर ऑनलाइन सोडत जून महिन्यात काढण्यात आली. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवड यादी जाहीर करण्यात आली नाही.
आता गुरुवारी (ता.१२) न्यायालयात आरटीईबाबत सुनावणी होईल. त्यामध्ये नेमके काय होते? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. शाळा सुरू होऊन महिना झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालकांनी निवड यादीची वाट न पाहता खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतले. तर काहींनी तात्पुरती नोंदणी केली आहे.
खासगी शाळांमध्ये नोंद
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आरटीईच्या एकूण ५७४ शाळा असून ४ हजार ४५१ जागा राखीव आहेत. जिल्ह्यातून जवळपास २० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. त्यातील अनेक पालकांनी इतर शाळांमध्ये प्रवेश घेतले. काहींनी आरटीईची वाट पाहणे पसंत केले असले तरी खासगी शाळांमध्ये नोंदणी करून ठेवली आहे.
प्रवेश प्रकरण न्यायप्रविष्ट
आरटीई पोर्टलवर उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिकानुसार आरटीई २५ टक्के प्रवेश प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार २५ टक्के प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल, अशी सूचना दिसत आहे.