महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसऱ्या टी -२० सामन्यात भारतीय संघाने २३ धावांनी विजय मिळवला आहे. फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवणारा रवी बिष्णोई आपल्या शानदार झेलमुळे चर्चेत आला आहे. त्याने पॉईंटला क्षेत्ररक्षण करताना अविश्वसनीय झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १८२ धावा केल्या. झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावा करायच्या होत्या. त्यावेळी भारतीय संघाकडून चौथे षटक टाकण्यासाठी आवेश खान गोलंदाजीला आला. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या ब्रायन बेनेटने बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने शॉट मारला. फलंदाजाने शॉट जोरदार मारला होता. मात्र पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रवी बिष्णोईने सुपरमॅन स्टाईल उडी मारली आणि भन्नाट झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यासह अवघ्या चौथ्या षटकात झिम्बाब्वेला तिसरा धक्का बसला.
What a catch by Ravi Bishnoi!!????????#ZIMvIND pic.twitter.com/w6ejtdB09N
— મનીયો_???????????? (@ManishJani_07) July 10, 2024
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर १८२ धावा केल्या. भारतीय संघाला ही मोठी धावसंख्या उभारून देण्यात कर्णधार शुभमन गिलने मोलाची भूमिका बजावली. त्याने ६६ धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने ४९ धावांची खेळी केली. सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जयस्वालने ३६ धावांची खेळी करत शानदार सुरुवात करून दिली.