महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.११ जुलै ।। वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज (दि.११) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी हाेणार हाेती. मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने NEET-UG 2024 प्रकरणांची सुनावणी तहकूब केली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार, १८ जुलै राेजी हाेणार आहे.
CBI ने तपास अहवाल सादर केलेला नाही
सुनावणी पुढे ढकलल्याबद्दल याचिकाकर्त्याच्या वकील नीतू वर्मा यांनी सांगितले की, “आजची सुनावणी पुढील गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सीबीआयकडून काही तपास अहवाल मागवला होता; पण CBI ने अद्याप कोणताही तपास अहवाल सादर केलेला नाही. आम्हाला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडून खूप आशा आहेत. ते मुलांच्या बाजूने निर्णय घेतील.”
केंद्रासह एनटीएने सादर केले शपथपत्र
नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबत केंद्र सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( NTA) ने ८ जुलै रोजी शपथपत्र दाखल करावीत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार केंद्र सरकार आणि ‘एनटीए’ने शपथपत्रे दाखल केली होती. केंद्राने असे म्हटले आहे की, आयआयटी मद्रासच्या तज्ज्ञांनी केलेल्या डेटा ॲनालिटिक्स अभ्यासानुसार परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत. तर NTA ने म्हटले आहे की ,टेलिग्राम ग्रुप्समधील NEET पेपर लीक झाल्याचे दाखवणारे व्हिडिओ बनावट आहेत. केंद्र आणि एनटीएने त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला की संपूर्ण परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड झालेली नाही.
#BREAKING #SupremeCourt adjourns the hearing of the NEET-UG 2024 matters till next Thursday (July 18). https://t.co/c6VmqvkOgF
— Live Law (@LiveLawIndia) July 11, 2024
५ मे २०२४ रोजी नीट परीक्षा झाली. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाला.
तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. तर काहींना ७२० पैकी ७१८, ७१९ गुण मिळाले. हरियाणाच्या एकाच केंद्रातील ६ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. यामुळे परीक्षेतील अनियमिततेबद्दल शंका निर्माण झाली.६७ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आल्यानेच पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचा आरोप करण्यात आला.