महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। रेल्वेमध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती मंडळाने तिकीट तपासणी (TC) पदासाठी मेगाभरती जारी केली आहे. अद्यापही रेल्वे मंडळाने याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केली नसून या महिन्याच्या अखेरपर्यंत नोकरीबाबत अधिसूचना देण्यात येईल. दरम्यान इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
रेल्वे भरती मंडळाने टीसी पदासाठी तब्बल ११ हजार २५५ पदांची भरती काढली आहे. याबाबत सर्व माहिती RRB च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या नोकरीत २५००० ते ३४,४०० रुपये मासिक वेतन मिळू शकणार आहे. त्यामुळे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम नोकरीची संधी असणार आहे.
वयोमर्यादा
या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. तर ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट देण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतून पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात येईल. नंतर मुलाखतीचा राउंड होईल. या फेऱ्यांमध्ये पास झालेल्या उमेदवाराची या नोकरीसाठी निवड करण्यात येईल.
अर्ज शुल्क
या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जाईल. सामान्य, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकडून ५०० रुपये फी घेतली जाईल. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकडून २५० रुपये फी घेतली जाईल.