Maharashtra MLC Election Result: जयंत पाटीलांचा पराभव नेमका कुठे झाला ? ; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ जुलै ।। राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. संध्याकाळी उशीरापर्यंत चालू राहिलेल्या मतमोजणीमध्ये सगळ्यात शेवटी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये विजयी ठरले. प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे मिलिंद नार्वेकरांचा विजय झाल्याचं सांगितलं जात आहे. पण पहिल्या पसंतीच्या मुख्य मतमोजणीत कुणाची मतं कुणाकडे गेली ?

काय सांगते आकडेवारी?
पक्षीय बलाबलानुसार भारतीय जनता पक्षाकडे १०३ मतं होती. भाजपानं पाच उमेदवार उभे केले होते. त्यांच्या सर्व उमेदवारांना प्रत्येकी २६ मतं मिळाली. याची बेरीज १३० होत असून यात पहिल्या पसंतीच्या मतांची बेरीज ११८ होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला एकूण १५ मतं जास्त मिळाली. त्यात भाजपासोबत असणाऱ्या मित्रपक्षांच्या मतांचा समावेश असला, तरी काँग्रेसची काही मतं फुटून भाजपाच्या पारड्यात गेल्याचं सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं दोन उमेदवार उभे केले होते. त्यांच्याकडे ४२ आमदारांचं संख्याबळ होतं. विजयासाठी त्यांना ४६ मतांची आवश्यकता होती. पण त्यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळून ४७ मतं मिळाली. त्यामुळे वरची पाच मतं कुणाची होती? असा प्रश्न केला जात ही पाच पहिल्या पसंतीची मतं काँग्रेसकडून आली असल्याचं मानलं जात आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उमेदवारांनाही भरभरून मतं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दोन उमेदवार उभे करण्यात आले होते. तयांच्याक़डे ३७ आमदार व बच्चू कडू यांचे दोन अशी ३९ मतं होती. त्याव्यतिरिक्त अपक्ष आमदारांचीही मतं त्यांच्या पाठिशी होती. या निवडणुकीत एकूण ४९ मतांनिशी शिंदे गटाचे दोन्ही उमेदवार जिंकून आले. त्यामुळे शिंदे गटाच्या मतांच्या बेरजेतही काँग्रेसच्या फुटलेल्या मतांचा वाटा असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे

काँग्रेसच्या प्रज्ञा सातव सहज विजयी, पण वरची मतं कुठे गेली?
काँग्रेसकडून फक्त प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पण त्यांचे ३७ आमदार आहेत. प्रज्ञा सातव २५ मतांनिशी विजयी झाल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे असणारी अतिरिक्त १२ मतं नेमकी कुणाकडे गेली? यावर आता पक्षीय पातळीवर चर्चा होणार असून त्यातली पाच मतं अजित पवारांच्या उमेदवारांच्या पारड्यात पडल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर दुसऱ्या पसंतीच्या मतांवर जिंकले
उद्धव ठाकरेंचे १५ आमदार असताना मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची २२ मतं मिळाली होती. पण एका मतासाठी त्यांना दुसऱ्या पसंतीच्या मतांवर अवलंबून राहावं लागलं. प्रज्ञा सातव यांच्या दुसऱ्या पसंतीच्या तीन मतांच्या रुपाने मिलिंद नार्वेकरांच्या पारड्यात विजयश्री पडल्याचं बोललं जात आहे.

जयंत पाटलांचा पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. शरद पवार गटाचे १२ आमदार आहेत. या सर्व १२ आमदारांची मतं जयंत पाटील यांना पडली. मात्र, त्याउपर इतर मतांची जुळवाजुळव त्यांना करता आली नाही. त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *