महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। स्पेनने सलग सहा सामने जिंकून धडाका राखलेला असला तरी लागोपाठ तीन लढतींत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारलेला इंग्लंडचा संघही तेवढाच धोकादायक आहे. साहजिकच युरो करंडक फुटबॉल विजेतेपदासाठी रविवारी (ता. १४) रात्री जोरदार चुरस अपेक्षित आहे.
लुईस दे ला फ्युएन्टे यांच्या मार्गदर्शनाखालील स्पेनने स्पर्धेत साखळी फेरीपासून प्रत्येक सामना जिंकलेला आहे. उपांत्य फेरीत त्यांनी फ्रान्सचे कडवे आव्हान मागे सारले. स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी लक्षात घेता, रविवारी रात्री स्पेनला चौथ्यांदा युरो करंडक पटकावण्याची जास्त संधी आहे. तसे झाल्यास स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारा पहिला संघ हा पराक्रम ते साधतील. स्पॅनिश संघाने यापूर्वी १९६४, २००८ व २०१२ मध्ये विजेतेपदाचा करंडक पटकावला आहे. १९८४ मधील अपवाद वगळता या संघाने प्रत्येक वेळी अंतिम लढत जिंकलेली आहे. स्पेनचे आक्रमण प्रभावी आहे. त्यांनी सहा लढतीत १३ गोल नोंदविले आहेत आणि फक्त तीन गोल स्वीकारले आहेत. यावरून स्पॅनिश संघातील समतोलता लक्षात येते.
गॅरेथ साऊथगेट यांच्या मार्गदर्शनाखालील इंग्लंडला अजिबात कमी लेखता येणार नाही. पिछाडीवरून सामना जिंकण्याचे कसब या संघाने आत्मसात केलेले आहे. बाद फेरीत स्लोव्हाकिया, उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडविरुद्ध, तर उपांत्य लढतीत नेदरलँड्सविरुद्ध इंग्लंडने पिछाडी भरून काढत आगेकूच राखली. स्वित्झर्लंडविरुद्ध ते पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकले, तर नेदरलँड्सविरुद्ध बदली खेळाडू ऑली वॉटकिन्स याने भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठणे शक्य झाले.
तीन वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर अंतिम लढतीत इटलीविरुद्ध १-१ गोल बरोबरीनंतर इंग्लंडला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांनी ही स्पर्धा कधीच जिंकलेली नाही, त्यामुळे ऐतिहासिक विजेतेपदासाठी इंग्लिश संघ इच्छुक आहे. १९६६ साली विश्वकरंडक जिंकल्यानंतर इंग्लंडला ५८ वर्षांत प्रमुख स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आलेले नाही.
लक्षवेधक खेळाडू
स्पेनचा लमिन यमाल इंग्लंडविरुद्ध खेळताना १७ वर्षे व एक दिवसाचा असेल, युरो करंडक अंतिम लढत खेळणारा तो सर्वांत युवा फुटबॉलपटू ठरेल. स्पर्धेत एक गोल व तीन असिस्टसह त्याने लक्ष वेधले आहे. शिवाय तीन गोल व दोन असिस्टची नोंद केलेला डॅनी ओल्मो, निको विल्यम्स, रॉड्री, फाबियन रुईझ यांच्यावर इंग्लंडवर दबाव टाकण्याची जबाबदारी असेल. इंग्लंडचा विचार करता, बुकायो साका याचे सातत्य स्पेनसाठी त्रासदायक ठरू शकते. कर्णधार हॅरी केन याने स्पर्धेत तीन गोल केले आहेत. ज्युड बेलिंगहॅम, १९ वर्षीय कॉबी मैनू, फिल फॉडेन यांच्यावर इंग्लंडची मदार असेल, तसेच गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्ड याची दक्षता महत्त्वपूर्ण असेल.
दृष्टिक्षेपात…
– एकमेकांविरुद्ध २७ सामने, इंग्लंडचे १३, स्पेनचे १० विजय, चार बरोबरी
– इंग्लंडचे ४५, तर स्पेनचे ३२ गोल
– युरो करंडकातील एका आवृत्तीत ओळीने सहा सामने जिंकणारा स्पेन पहिला संघ
– यंदा इंग्लंडचे स्पर्धेत तीन विजय, तीन बरोबरी
– स्पेन पाचव्यांदा अंतिम फेरीत, यापूर्वी चारपैकी तीन सामन्यांत विजय
– इंग्लंड सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल, यापूर्वीच्या एकमेव लढतीत पराभूत
– इंग्लंडपूर्वी सोव्हिएत युनियन, जर्मनी (पश्चिम जर्मनी), स्पेन लागोपाठ दोन वेळा अंतिम फेरीत
युरो करंडक २०२४ स्पर्धेतील कामगिरी
स्पेन- साखळी फेरी ब गट- वि. वि. क्रोएशिया ३-०, वि. वि. इटली १-०, वि. वि. अल्बानिया १-०, राऊंड ऑफ १६ – वि. वि. जॉर्जिया ४-१, उपांत्यपूर्व फेरी – वि. वि. जर्मनी २-१ (अतिरिक्त वेळेत), उपांत्य फेरी – वि. वि. फ्रान्स २-१.
इंग्लंड – साखळी फेरी क गट – वि. वि. सर्बिया १-०, बरोबरी वि. डेन्मार्क १-१, बरोबरी विरुद्ध स्लोव्हेनिया ०-०, राऊंड ऑफ १६ – वि. वि. स्लोव्हाकिया २-१ (अतिरिक्त वेळेत), उपांत्यपूर्व फेरी – बरोबरी वि. स्वित्झर्लंड १-१ (पेनल्टी शूटआऊट ५-३), उपांत्य फेरी – वि. वि. नेदरलँड्स २-१.