महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जुलै ।। मॉन्सून सक्रिय झाल्याने पुणे जिल्ह्यातच दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. तर घाटमाथ्यावरही पावसाची संततधार सुरू आहे. रविवारी (ता.१४) जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
काल शनिवारी सकाळपासूनच शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. संततधारपणे पडणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना प्रथमच मॉन्सूनच्या सरींची अनुभूती आली. जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषतः घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू होती. शनिवारी संध्याकाळी साडेपाच पर्यंत लोणावळा येथे सर्वाधिक ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कमी पावसाची नोंद ढमढेरे येथे झाली.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे आलेला असून, राजस्थानच्या श्री गंगानगरपासून हिस्सार, दिल्ली, बाराबंकी, देहरी, असनसोल ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर गुजरात आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. महाराष्ट्रापासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता आहे.
शनिवारी संध्याकाळी साडे पाच पर्यंतचे पर्जन्यमान (मिलिमीटर)
– लोणावळा ः ६८
– लवासा ः ४०
– गिरीवण ः २३
– माळीण ः १५
– शिवाजीनगर ः २.५
– राजगुरुनगर ः ३.५