महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुलै ।। देशातील घाऊक महागाई दरामध्ये (डब्ल्यूपीआय) वाढ झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाई दर (डब्ल्यूपीआय) 3.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या चार महिन्यांपासून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. यापूर्वी हा महागाई दर मे महिन्यात 2.61 टक्के, तर एप्रिल महिन्यात 1.26 टक्के होता.
या महिन्यात खाद्यपदार्थ, अन्न उत्पादने, कच्चे तेल, पेट्रोल, नैसर्गिक वायू आणि इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे घाऊक महागाईतील वाढ नोंदवण्यात आली आहे. भाज्यांचे भाव प्रचंड वाढले आहेत. जूनमध्ये भाज्यांच्या महागाईचा दर 38.76 टक्के झाला आहे, तो मे महिन्यात 32.42 टक्के होता. कांद्याचा महागाई दर 93.35 टक्के, तर बटाट्याचा भाव 66.37 टक्के झाला आहे. याशिवाय डाळींवरील महागाई वाढली असून, जूनमध्ये ती 21.64 टक्क्यांवर पोहोचली आहे. नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादित उत्पादनांच्या किमतीही वाढल्या आहेत.
दरम्यान, यापूर्वी सरकारकडून किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती, त्यातही घाऊक महागाईप्रमाणे वाढ झाली होती. 12 जुलै रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये किरकोळ महागाई दर 5.1 टक्क्यांवर पोहोचला होता. हा दर चार महिन्यांचा उच्चांकी होता.