महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ जुलै ।। कात्रज/ शिवाजीनगर – स्वारगेट आणि वाकडेवाडी एसटी बस स्थानकांच्या स्वच्छतागृहांमध्ये गेल्या चार वर्षांत ठेकेदाराने सुमारे साडेपाच लाख प्रवाशांकडून तब्बल तीन कोटी रुपये लूटल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘ठेकेदारांनी चोरली पुण्याची स्वच्छतागृहे’ या मथळ्याखाली वृत्त दिल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला असून, एका बस स्थानकावरून दैनंदिन सुमारे १२ हजार प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी लघुशंकेसाठी पुरुषांना शुल्क आकारण्यात येत नसले, तरी महिलांसाठी सरसकट पाच ते दहा रुपये आकारण्यात येत असल्याचे ‘एका वृत्तपत्राने समोर आणले होते.
लघुशंकेसाठी स्वारगेट बस स्थानकाच्या स्वच्छतागृहात शुल्क आकारणी केल्यामुळे मागील दोन महिन्यांत तक्रारीनंतर दोन वेळा दोन हजार ४०० रुपयांप्रमाणे ४ हजार ८०० रुपये दंड आकारणी करण्यात आली आहे, तर वाकडेवाडी बस स्थानकातही प्रवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर ठेकेदाराला सहा हजार रुपये, असा एकूण तीन वेळा दंड करूनही एसटी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शुल्क आकारणी सुरूच असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता एसटी प्रशासनाने ठोस पावले उचलत ठेकेदारांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. चार वर्षांपूर्वी मे. सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस या संस्थेला ठेका देण्यात आला आहे.
१२ हजार – दररोज प्रवास करणाऱ्या महिलांची सरासरी संख्या
चार हजार – ३३ टक्के महिलांकडून स्वच्छतागृहांचा वापर
२० हजार रुपये – प्रतिप्रवासी स्वच्छतागृह वापर शुल्क
सहा लाख रुपये – रोज २० हजार रुपयांप्रमाणे महिन्याला होणारी लूट
७२ लाख रुपये – वाकडेवाडी आणि स्वारगेट बस स्थानकांवर वर्षाला गैरव्यवहार
तीन कोटी रुपये – वर्षाला ७२ लाखांप्रमाणे चार वर्षांत झालेली लूट
मे २०२० पासून – सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिसेस संस्थेला ठेका
मे २०३५ – सुलभ इंटरनॅशनल संस्थेच्या ठेक्याची मुदत
(वरील आकडेवारीत पुरुषांना शौचालयासाठी आकारण्यात आलेल्या अधिकच्या शुल्काचा किंवा महिला व पुरुष दोघांना अंघोळीसाठी आकारण्यात आलेल्या अधिकच्या शुल्काचा समावेश नाही. गर्दीच्या वेळी यात बदल होऊ शकतो.)
अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास दंडआकारणी करण्यात येते. करारामधील अटींप्रमाणे यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल. याआधीही अनेकवेळा संबंधित ठेकेदारास प्रवाशांच्या तक्रारीनंतर दंड आकारण्यात आलेला आहे. केवळ वाकडेवाडी आणि स्वारगेटच नाही, तर पुणे स्टेशनवरील स्वच्छतागृहाबाबतही तक्रार आल्यास दंड आकारण्यात आलेला आहे.
– प्रमोद नेहुल, विभाग नियंत्रक, पुणे विभाग, राज्य परिवहन महामंडळ
‘त्या’ची बदली
सरसकट पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात आली असून, त्याची इतर ठिकाणी बदली करण्यात आली आहे. या पुढे महिलांच्या स्वच्छतागृहाबाहेर दिवसभर महिला कर्मचारी राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. सर्व स्वच्छतागृहे स्वच्छ राहतील याची ग्वाही मे. सुलभ इंटरनॅशनल सोशल सर्व्हिस ऑर्गनायझेशनकडून देण्यात आली आहे.