आता माझ्या मार्गदर्शनाची गरज भासतेय ? ! भुजबळांचा पवारांच्या शैलीत समाचार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जुलै ।। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते बैठकीला येणार होते. पण बारामतीमधून एक फोन गेल्यांनी त्या नेत्यांनी दांडी मारली, अशा शब्दांत भुजबळांनी रविवारी बारामतीत झालेल्या जाहीर सभेतून पवारांना लक्ष्य केलं. या टिकेला २४ तास उलटत नाही तोच भुजबळ मुंबईतील पवारांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

भुजबळांनी भाषणातून केलेली टीका आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी घेतलेली भेट यावर शरद पवारांनी पुण्यात भाष्य केलं. ‘ हल्ली त्यांची दोन, चार भाषणं छान झाली. बारामती आणि बीडमधलं त्यांचं भाषण छान झालं. त्यांनी माझ्या विषयी आस्था व्यक्त केली. भुजबळ आले होते. ते एक तास थांबले. भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणाले. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. महाराष्ट्र शांत करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं,’ असं पवारांनी सांगितलं.

‘जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री यांचा संयुक्त कार्यक्रम झाला म्हणजे त्यांच्यात संवाद होता. दुसरीकडे एका गृहस्थानं ओबीसी आरक्षणासाठी उपोषण केलं, तेव्हा सरकारचं बोलणं झालं. त्यांच्यात आणि सरकारमध्ये काय बोलणं झालं याबद्दलचं वास्तव पुढे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही म्हणून बैठकीला गेलो नाही,’ असं पवार म्हणाले.

जातीय वाद वाढायला या लोकांची वक्तव्यं कारणीभूत आहेत. राज्यकर्त्यांनी वाद मिटवण्याची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र ती किती घेतली हे माहीत नाही. आम्हा लोकांना बाजूला ठेऊन निर्णय घेतले आणि आता शांतता प्रस्थापित करायला शरद पवारांची गरज असल्याचं म्हणत मार्गदर्शन करा सांगतात, असा टोला पवारांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *