Ajit Pawar-BJP: ‘अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्याचा भाजपचा संदेश’ ? ; कोणी केला खळबळजनक दावा?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार का अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने मोठा दावा केला आहे. भारतीय जनता पक्षाने अजित पवारांना महायुतीमधून बाहेर पडण्याचा संदेश दिल्याचा खळबळजनक दावा शरद पवार गटाच्या प्रवक्त्याने केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संलग्न साप्ताहिक ‘विवेक’मध्ये असा दावा करण्यात आला होता की, भाजपने अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे पक्षाला तोटा झाला. लोकसभा निवडणुकीमध्ये खराब कामगिरीचे कारण, अजित पवारांच्या राष्ट्रावादी काँग्रेसला सोबत घेणे हे आहे. भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीसोबत जाणं पटलं नव्हतं. त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला निवडणुकीत नाकारलं.

विवेकमधून एक अनौपचारिक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यामुळे अनेकांमध्ये नाराजी होती. शरद पवारांची राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी भाजपसोबत येणे अनेकांना पटलं नाही, असं संघाच्या सर्व्हेमध्ये म्हणण्यात आलं आहे.

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते क्लाइड क्रॅस्टो (Clyde Crasto) यांनी दावा केलाय की, भाजपला आता जाणीव झाली आहे की अजित पवारांसोबत युती करून आपण चूक केली आहे. यामुळे आपल्याला नुकसान झाले आहे अन् पुढे देखील नुकसान होणार आहे. त्यामुळे अजित पवार गटाला महायुतीमधून बाहेर पडण्याचा भाजपचा संदेश देत आहे.

क्लाइड क्रॅस्टो म्हणाले की, ‘महाराष्ट्राच्या जनतेने मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. भाजप त्यामुळे काळजीत पडली आहे. त्यांना विधानसभा जिंकायची आहे. पण, अजित पवारांसोबत युती असल्याने लोकसभेप्रमाणे विधानसभेत आपला पराभव होईल असं त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ‘विवेक’मधील लेख अजित पवारांना महायुतीमधून बाहेर पडण्याचा संदेश आहे.’

क्रॅस्टो यांनी असाही दावा केलाय की, भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत केलेली युती राज्याच्या जनतेने स्वीकारलेली नाही. जी स्थिती अजित पवारांसोबत आहे, तीच स्थिती एकनाथ शिंदेंसोबत आहे. भाजपने या दोघांशी युती करणे जनतेने स्वीकारलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *