महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जुलै ।। पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांना रानभाज्यांचे वेड लागतात. गेल्या काही दिवसात कोकणात संतत धार पडणार्या पावसामुळे रानावनात तयार होणार्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये विक्रीसाठी येत आहेत. या रानभाज्या ग्राहकांचे पसंती असून मागणीसुद्धा चांगली आहे. पावसाच्या सुरुवातीलाच रानभाजी शेवळ तयार झाली असून नंतर रानावनातील झाडाझुडपात आढळणारे रानातील फळ भाजी म्हणजेच करटोली होय. दरवर्षीपेक्षा यंदाचे वर्षी मोठ्या प्रमाणात हि भाजी जंगलात मिळत असून ती मार्केटमध्ये हि विक्रीसाठी आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात करटोलीची भाजी विक्रीसाठी बाजारपेठेतून येत असून यावर्षी एका किलोला ३०० ते ४००/- रुपये एवढा भाव मिळत आहे. आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी उत्तम असलेली करटोलीची भाजी सुरुवातीच्या पावसात मिळत असल्याने या भाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. खाण्यासाठी चविष्ट व रुचकर असलेली करटोलीची रानभाजी गृहिणींचीही मोठ्या प्रमाणात पसंती असते. आदिवासी महिलांना या रानभाज्या विक्रीतून चांगली कमाई होत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० ते १०० रुपये यावर्षी करटोलीची भाजी महाग झाली आहे. यावर्षी ३०० ते ४००/- रुपये किलोने करटोलीची भाजी विकली जात आहे.
पुढील काही दिवसच ही भाजी उपलब्ध होणार असल्याने खवय्ये करटोलीची भाजी आवडीने विकत घेत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला करटोलीची वेल उगवते साधारणता महिनाभरात करटोलीला फळे येतात. ही फळं भाजी खाण्यासाठी अत्यंत रुचकर असल्याने ग्राहकांची चांगली मागणी आहे. झाडाझुडपात वाढत असणारी करटोलीची वनस्पती फळे मिळवणे कष्टाचे आहे. यातून चांगली आर्थिक कमाई होत असून रोजगार मिळत आहे.