कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येतील ; राष्ट्रवादीच्या या आमदाराचे खळबळजनक वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० जुलै ।। लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांत आपली ताकत किती, याची जोजवणी या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही नेते, विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोईच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत. असे असतानाच सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल आहे. याच भेटीवर बेनके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार आमच्यासाठी दैवत
अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट गेतल्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बेनके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का? असे विचारले जात आहे. या चर्चा चालू असतानाच बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असं मला वाटतं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या 40 वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरं झाली. सहा महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत करेन,” असं बेनके म्हणाले.

त्यांचे स्वागत करणे ही माझी जबाबदारी
“मी लोकसभा निवडणुकीत घडाळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे आढळराव पाटील यांचा प्रचार केला म्हणून वेगळे प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शरद पवार यांचे स्वागत करणे ही माझी जबाबदारी आहे. पण त्यांच्या स्वागतापलीकडे दुसरं काहीही नव्हतं,” असं बेनके यांनी स्पष्ट केलं.

कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येऊ शकतील
“पक्षप्रवेशाबाबत मला शरद पवार काहीही बोलले नाहीत. मीही त्यांना काहीही बोललो नाही. म्हणूनच पक्षांतराचा प्रश्नच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली. भविष्यात काहीही होऊ शकतं. कदाचित शरद पवार, अजित पवार एकत्रही येऊ शकतील. भविष्यातील राजकारणाबाबत सध्यातरी काहीही सांगता येत नाही. मी घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. पण भविष्यात स्थित्यंतरं घडली तर मी काही सांगू शकत नाही,” असेही अतुल बेनके म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *