महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। लोणावळ्यात यावर्षीचा रेकॉर्डब्रेक पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासात २७५ मिलिमीटर पाऊस कोसळला असून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. यावर्षीचा हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला, असल्याने लोणावळ्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. आतापर्यंत लोणावळ्यात २६०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत १०१ मिलिमीटरने जास्त आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत २५०१ मिलिमीटर पाऊस झाला होता.
लोणावळ्यात गेल्या २४ तासात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. २४ तासात तब्बल २७५ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. लोणावळा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्रासह देशभरातून पर्यटक हे लोणावळ्यात दाखल होतात. सर्वाधिक पुणे, मुंबई या ठिकाणचे पर्यटक हमखास येतात. सह्याद्रीच्या डोंगर रांगेतून धबधबे वाहू लागले आहेत. याचा आनंद घेण्यासाठी शनिवार रविवार पर्यटक मोठी गर्दी करतात. भुशी धरण यासह इंद्रायणी नदी ओसंडून वाहू लागली आहे. काही ठिकाणी रस्त्याला देखील नदीच स्वरूप आलेलं आहे