महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ जुलै ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. कॅन्सरच्या औषधांपासून ते सोने-चांदीपर्यंत अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. मात्र, अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याही आहेत. अशा परिस्थितीत, २०२४ च्या अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणांवर एक नजर टाकू या.
या अर्थसंकल्पानुसार नवीन कर प्रणाली जाहीर झाली आहे. यानुसार आता तीन लाख रुपयांपर्यंत इन्कम असलेल्या नागरिकांना कर भरावा लागणार नाही. तीन ते सहा लाख रुपये उत्पन्न असल्यास आता ५ टक्के कर भरावा लागेल. सात ते दहा लाख रुपये उत्पन्न असल्यास आता १० टक्के कर असेल तर दहा ते बारा लाख रुपये उत्पन्नावर १५ टक्के, बारा ते पंधरा लाख रुपये उत्पन्नावर २० टक्के आणि पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक जर उत्पन्न असेल तर ३० टक्के कर भरावा लागणार आहे.
सोने आणि चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली. आयात केलेले दागिने स्वस्त होतील. कॅन्सरची औषधे, प्लॅटिनम, मोबाईल फोन, मोबाईल चार्जर, इलेक्ट्रिकल वायर, एक्स-रे मशीन, सोलर सेट, लेदर आणि सीफूड या बजेटमध्ये स्वस्त करण्यात आले आहेत.
पीएम आवास योजना-शहरी २.० च्या घोषणेअंतर्गत, १ कोटी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या घरांच्या गरजा १० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने पूर्ण केल्या जातील. यामध्ये पुढील पाच वर्षांत २.२ लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय मदतीचा समावेश असेल.
केंद्र सरकार २५ हजार गावांमध्ये ऑल वेदर कनेक्टिव्हिटी पुरवणार आहे. यासोबतच पीएम ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्यात नवीन रस्तेही बांधले जाणार आहेत.
पूरग्रस्त बिहारला ११,५०० कोटी रुपयांची मदत. यासोबतच बिहारला महामार्गासाठी केंद्र सरकारकडून २६ हजार कोटी रुपयांची भेट मिळाली आहे.
नोकरदार लोकांच्या मुलांसाठी NPS वात्सल्य सुरू केले आहे. पालकांना या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.
बजेटमध्ये कृषीसाठी १.५२ लाख कोटींची व्यवस्था. तर १० ठिकाणी मोठ्या नागरी सांडपाणी प्रक्रिया करण्याचे काम करण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेश राज्याला १५ हजार कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज.
सोहरमध्ये इंडस्ट्रीयल पार्क बनवणार, पाच वर्षांत एक कोटी तरुणांना प्रशिक्षण.
महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी सरकारने ३ लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद करुन ठेवली आहे.