Pune Rain: पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग ; रस्त्यांवर कमरेइतकं पाणी ; प्रशासनाकडून हाय अलर्ट जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। पुण्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Pune Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळे पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांसोबत प्रवाशांचे देखील हाल होत आहे. पुण्यात मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीमुळे जवजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे महानगर पालिका प्रशासनाकडून नागरिकांना मदत केली जात आहे. या पावसामुळे पुण्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे वारजे, शिवणे, सिंहगड रोड, शिवाजीनगर याठिकाणी पाणी साचले आहे. वारजेतील स्वामी विवेकानंद सोसायटी आणि फ्युचेरा सोसायटीत पाणी शिरले. शिवणे येथील सदगुरू सोसायटीत पाणी साचले आहे. सिहंगड रोड याठिकाणी सरिता नगरी, एकता नगरी आणि इतर तीन सोसायटीमध्ये पाणी साचले आहे. नदीपात्र रस्ता, रजपुत वीटभट्टी नजीक, गंजपेठ, चांदतारा चौकामध्ये कमरेइतके पाणी साचले आहे. अनेक वाहनं पाण्यामध्ये बुडाली आहेत. किरकटवाडी ओढा परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कारण पुण्यात पावसाचा जोर कायम असल्याने ओढ्याला पूर आला आहे.

पुण्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण ओव्हर फ्लो झाले आहे. खडकवासला धरणातून विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी जमा झाले आहे. १४ वर्षानंतर प्रथमच नारायण पेठेत पाणी शिरलं आहे. स्थानिक प्रशासनाकडून कुठलेही लक्ष नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या पावसामुळे पुण्यातील भवानी पेठ, केरेगाव पार्क, बर्निंग घाट याठिकाणी भिंत पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुण्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान कार्यरत झाले आहे. पाणी शिरलेल्या परिसरात अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरु आहे. पुण्यात वडगाव शेरी, आनंदनगर बसस्टॉप येथे एका वाहनावर झाड कोसळले. सुदैवाने वाहनात असलेली शाळेची मुले आणि वाहनचालक सुरक्षित आहेत. अग्निशमन दल रवाना घटनास्थळी रवाना झाले आहेत. पुण्यात विजेचा धक्का लागून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. भिडे ब्रिज परिसरात ही घटना घडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *