![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २५ जुलै ।। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. १९ ऑगस्टला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होणार आहेत. दीड कोटी महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये दोन महिन्यांचे असे ३ हजार रुपये जमा होणार आहेत. ‘साम टीव्ही’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना राज्य सरकारने महिलांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणण्यात आली आहे. सरकारच्या या नव्या योजनेमुळे महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत दीड कोटींपेक्षा अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. हा आकडा दोन कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
अंदाज
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात अपयश आलं. आता तीन ते चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात लाडकी बहीण योजना आणण्यात आली आहे. अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांनी या योजनेची घोषणा केली आहे. महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी महिलांना ३१ ऑगस्टपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. ही तारीख पुढे वाढवली जाण्याची शक्यता आहे. महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार आहेत. रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा करा असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. सरकारकडून महिलांना हे ‘रक्षाबंधन गिफ्ट’ असल्याचं बोललं जातंय
योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्राबाहेर महिलांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं होतं. नाव नोंदणीसाठी महिलांची झुंबड उडाली होती. अनेक महिला अजूनही नोंदणी करत आहेत. जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत.
